
निवडणुकीत आईचा पराभव झाल्याने शिंदे गटाच्या पवन पवार याने भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकाकडे पन्नास लाखांची खंडणी मागून मारहाण केली. या प्रकरणी पवारसह बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन सराईतांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.
नाशिक रोड भागातील प्रभाग 18 मधून शिंदे गटाचे पवन पवार यांच्या आई आशा पवार या भाजपचे शरद मोरे यांच्याकडून पराभूत झाल्या. शुक्रवारी संध्याकाळी पवन पवार, विशाल पवार यांनी अन्य 12 जणांसोबत जेल रोड भागातील मोरे यांचे घर गाठले. निवडणुकीत पन्नास लाख रुपये खर्च झाले त्याची भरपाई दे, असे सांगून मोरे व त्यांची बहीण गीता यांना मारहाण केली, गळ्यातील हार हिसकावला, चाकूने वार केले, जीवे मारण्याची धमकी दिली, परिसरातील नागरिकांना दमबाजी करत दहशत निर्माण केली, अशी फिर्याद गीता मोरे यांनी शनिवारी नाशिक रोड पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून वरील दोघांसह यश गरुड, दीपक सदाफळे, विजय सिंग ऊर्फ शिंग्या, बंटी काळे, किरण गाटोळे, शुभम आदमाणे, सचिन तोरणे ऊर्फ घोड्या, अनुराग सागवान ऊर्फ मिताले, भुऱया खेडकर व प्रशांत सदाफळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यश, दीपक व अनुराग यांना अटक करण्यात आली. अन्य संशयित फरार असून त्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती तपासी अधिकारी सहाय्यक निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी यांनी दिली.

























































