फडणवीसांनी दावा केलेल्या कंपन्या महाराष्ट्रात का येत नाहीत? रोहित पवार यांची मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दावोस दौऱ्यावरून टीका केली आहे. अनेक वर्षांपासून फडणवीस दावोसला जात आहेत, अनेक कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणूक करणार असा दावा त्यांनी केला होता, मग त्या कंपन्या महाराष्ट्रात का येत नाहीत? असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे.

रोहित पवार यांनी ट्विट करून कोणत्या कंपन्यांनी महाराष्ट्राऐवजी देशातील इतर राज्यांची निवड केली त्याचा दाखला दिला आहे. डिज्ने ही मनोरंजन क्षेत्रातील तर हनीवेल ही सायबर सिक्युरिटी तंत्रज्ञानातील आघाडीची कंपनी आहे. या दोन्ही कंपन्यांनी हिंदुस्थानात विस्तार करण्यासाठी बंगळुरूमधील बेलंदूरची निवड केलीय. डिज्नेने बेलंदूर इथे 1 लाख 74 हजार चौरस फूट जागा भाड्याने घेण्याचा करार केला आहे, तर हनीवेलने तब्बल 4 लाख चौरस फुटांचे कार्यालय सात वर्षांसाठी घेतले आहे. डिलॉईट कंपनीनेदेखील मंगळुरूमध्ये येऊन 50 हजार लोकांची भरती करणार असल्याची घोषणा केली आहे. मारुती सुझुकी 35 हजार कोटींची गुंतवणूक करून गुजरातमध्ये नवा प्लांट उभारत आहे, असे रोहित पवार यांनी नमूद केले आहे. मुंबई पर्यायाने महाराष्ट्र देशाचे आर्थिक इंजिन असताना व राज्यात बेरोजगारी वाढत असताना या कंपन्या आपल्याकडेही गुंतवणूक का करत नाहीत, असा एक नागरिक म्हणून प्रश्न पडतो, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.