
दोन दिवसांपासून अंधारात चाच पडणाऱ्या शहापूर पंचायत समितीच्या बांधकाम विभाग कार्यालयात पुन्हा एकदा वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. दैनिक ‘सामना’ने वृत्त प्रसिद्ध करताच खडबडून जाग आलेल्या प्रशासनाने लटकवलेले नऊ महिन्यांचे वीज बिल तत्काळ भरले आहे. त्यामुळे ठप्प पडलेली संगणकीय प्रणाली सुरू झाली असून अंधाऱ्या कोठडीतून या कार्यालयाची सुटका झाली आहे. शहापूर पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे एप्रिल ते डिसेंबरपर्यंत सुमारे ७० हजार रुपये रकमेचे वीज देयक थकले होते.
ठाणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे याबाबत वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने वीज वितरण कंपनीने दोन दिवसांपूर्वी शहापूर पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचा वीजपुरवठा खंडित केला होता. त्यामुळे अंधारात वावरणाऱ्या बांधकाम विभागातील संगणकीय कामकाज ठप्प होते. विकासकामांच्या नोंदी, अंदाजपत्रके, मोजमाप पुस्तके तसेच देयक प्रक्रियेलाही मोठा फटका बसला होता. मात्र दैनिक ‘सामना’ने याबाबत वृत्त प्रसिद्ध करताच प्रशासन जागे झाले आणि त्यांनी लटकलेले वीज देयक भरले.
प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा फटका जनतेला
वीजपुरवठ्याअभावी बांधकाम विभाग अंधारात चाचपडत असल्याने विविध कामासाठी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना आल्या पावली परत जावे लागत होते. प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा फटका थेट जनतेला बसत होता. मात्र थकीत रकमेच्या वीज देयकाची रक्कम भरल्यानंतर बांधकाम विभागाचे वीज मीटर लावून वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.


























































