
माणगावातील टपाल कार्यालयाच्या इमारतीची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे कार्यालयाच्या भिंती कोसळल्या असून त्याला झाडाझुडपांनी वेढा घातला आहे. स्वतःची वास्तू असतानादेखील टपाल कार्यालय भाड्याच्या जागेत सुरू आहे. गेल्या आठ वर्षांपासून नवीन इमारतीची एक वीटही रचली गेली नाही. ही इमारत कधीही कोसळेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
माणगाव येथील जिल्हा परिषद मराठी शाळेसमोरील १५ गुंठे जागेत टपाल कार्यालय आहे. या कार्याल याची इमारत शेवटची घटका मोजत आहे. वड, पिंपळाच्या मोठ्या वेलींनी ही ऐतिहासिक वास्तू अक्षरशः गिळून टाकली आहे. निधी न मिळाल्याने गेल्या आठ वर्षांपासून या इमारतीचे काम लटकले आहे. हक्काची जागा असूनही माणगाव टपाल कार्यालय मोर्बा रोडवर भाड्याच्या इमारतीत सुरू आहे. याचे दरमहा सुमारे ३३ हजार रुपये भाडे आहे. शासनाने आतापर्यंत यावर लाखो रुपये खर्च केले आहेत.
निधीअभावी काम रखडले
नवीन टपाल कार्यालयाची इमारत उभी राहावी यासाठी आठ वर्षांपूर्वी तत्कालीन पोस्टमास्तर यांनी मुंबई आणि दिल्ली येथील मुख्य कार्यालयांना प्रस्ताव पाठवला होता. त्यानंतर जागेचे सर्वेक्षणही करण्यात आले होते. मात्र निधी न मिळाल्यामुळे इमारतीचे काम रखडले आहे. गेल्या वर्षी पुन्हा प्रस्ताव पाठवण्यात आला, परंतु अद्यापही निधी मंजूर झालेला नाही. त्यामुळे या ठिकाणी एखादी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल माणगावकरांनी विचारला आहे.


























































