
रायगड जिल्हा परिषदेसाठी युती करण्याचा प्रस्ताव भाजपने शिंदे गटाला दिला होता. मात्र युतीचा हा प्रस्ताव कचऱ्यात फेकत शिंदे गटाने परस्पर पाच उमेदवार जाहीर केले आहेत. यामधील एका उमेदवाराने आपला उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. यामुळे रायगड जिल्ह्यात भाजप व शिंदे गटात बिघाडी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शिंदे गटाच्या या आडमुठ्या भूमिकेवर भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त करत धडा शिकवण्याचा निर्धार केला आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान तर ७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांची युती, आघाडीच्या गणितांची जुळवाजुळव करत मित्र पक्षांसोबत जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. मात्र राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजप, शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट या महायुतीमध्ये बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे. भाजपचे दक्षिण रायगड निवडणूक प्रमुख सतीश धारप यांनी आपण जागा वाटपाबाबत शिंदे गट व अजित पवार गटाला प्रस्ताव दिल्याचे सांगितले. मात्र शिंदे गटाने अलिबाग तालुक्यात आपल्या पाच उमेदवारांची नावे जाहीर केली असून माजी समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांनी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला आहे.
तटकरेंनी नामोल्लेख टाळला
मागील आठवड्यात अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी आमची भाजपसोबत युतीची बोलणी सुरू असल्याचे सांगितले होते. मात्र त्यांनी शिंदे गटाचा नामोल्लेख टाळला होता. तसेच सकारात्मक प्रतिसाद न आल्यास स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे महायुतीत आल बेल नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.


























































