Video – स्पेनमध्ये दोन हाय-स्पीड ट्रेनची जोरदार धडक; 21 प्रवाशांचा मृत्यू, 100 हून अधिक जखमी

स्पेनमध्ये रविवारी सायंकाळी भीषण रेल्वे अपघात झाला. कोर्डोबा प्रांतातील अदामुझ शहराजवळ दोन हाय-स्पीडची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात 21 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर 100 हून अधिक जखमी झाले आहेत. स्पेनची सरकारी वृत्तवाहिनी RTVE आणि ‘रॉयटर्स’ने याबाबत वृत्त दिले आहे.

वृत्तानुसार, हा अपघात कोर्डोबा प्रांतात रविवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास घडला. मागाला येथून माद्रिदला जाणारी इरिओ कंपनीची खासगी हाय-स्पीड ट्रेन आणि माद्रिदहून हुएलाकडे जाणारी रेन्फे कंपनीची ट्रेन यांच्यात ही धडक झाल्याची माहिती मिळतेय. इरिओ कंपनीची ट्रेन आधी रुळावरून घसरली आणि बाजूच्या रेल्वे ट्रॅकवर गेली. याचवेळी माद्रिदहून येणाऱ्या रेन्फे कंपनीच्या ट्रेनची तिला जोरदार धडक बसली.

भीषण अपघातानंतर दोन्ही ट्रेनचे डबे रेल्वे ट्रॅकवर विखूरले गेले. अनेक डबे रुळावरून घसरले, काही डबे एकमेकांवर पलटी झाले. हा अपघात एवढा भीषण होता की रेल्वे डब्यात अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री मागवावी लागली. ट्रेनचे डबे कापून आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. मृतदेह बाजूला करून आम्हाला जीवंत लोकांपर्यंत पोहोचावे लागले असे कोर्डोबाचे अग्निशमन विभागाचे प्रमुख पाको कार्मोना यांनी सांगितले.

21 प्रवाशांचा मृत्यू

हा अपघात घडला तेव्हा इरिओ कंपनीच्या ट्रेनमध्ये 300 हून अधिक प्रवासी होते, तर रेन्फे कंपनीच्या ट्रेनमध्ये 100 प्रवासी होते. यापैकी 21 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये रेन्फे कंपनीच्या ट्रेन चालकाचाही समावेश आहे. तसेच 100 हून अधिक जखमी झाले असून जखमींपैकी 25 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

भयावह अनुभव

दरम्यान, ट्रेन अपघातातून बचावलेल्या प्रवाशांनी सोशल मीडियावर आपले भयावह अनुभव शेअर केले आहेत. कोर्डोबा सोडल्यानंतर काही मिनिटातच ट्रेनला हादरे बसून लागले. अचानक ट्रेनमधील दिवे बंद झाले आणि मागचे डबे रुळावरून घसरले, असे एका प्रवाशाने सांगितले. अपघातानंतर प्रवासी प्रचंड घाबरले होते. या संकट काळात स्थानिक नागरिकांनी अपघातग्रस्त भागात अन्न, ब्लँकेट आणि गरम पेयांची व्यवस्था केली होती.