इंडिगोच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, टॉयलेटमध्ये टिश्यू पेपरवर लिहिला संदेश

indigo

इंडिगोच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली. दिल्लीहून बागडोगरा (पश्चिम बंगाल) जात असलेल्या विमानाचे लखनऊमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. या विमानात 222 प्रवासी आणि कर्मचारी होते.

इंडिगोचे विमान 6ई 6650 सकाळी दिल्लीहून बागडोगरासाठी झेपावले होते. विमान हवेत असतानाच विमानातील टॉयलेटमध्ये एका कर्मचाऱ्याला हाताने लिहिलेली एक चिठ्ठी आढळली. एका टिश्यू पेपरवर ‘विमानात बॉम्ब आहे’ असे लिहिलेले होते. ही माहिती मिळताच वैमानिकाने तत्काळ एअर ट्रफिक कंट्रोलला याची कल्पना दिली. सकाळी 8.46 च्या सुमारास एटीसीकडून लखनऊ विमानतळाला या घटनेची माहिती मिळाली. सुरक्षेच्या कारणास्तव विमानाचा मार्ग वळवण्यात आला आणि सकाळी 9.17 वाजता लखनऊच्या चौधरी चरण सिंह विमानतळावर विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात आले. विमान खाली उतरताच सुरक्षा यंत्रणांनी आणि बॉम्ब शोधक पथकाने विमानाचा ताबा घेतला.

तपास सुरू

एसीपी रजनीश वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानातील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे. ज्या टिश्यू पेपरवर बॉम्बची धमकी लिहिली होती, तो पेपर कोणी ठेवला याचा तपास सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक बाबींच्या आधारे केला जात आहे. प्राथमिक तपासात विमानाची सखोल तपासणी केली असता अद्याप कोणतीही संशयास्पद वस्तू सापडलेली नाही. मात्र या धमकीमुळे विमानतळावर हाय अलर्ट जारी करण्यात आला. प्रवाशांना बागडोगरा येथे पोहोचवण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली.