केदारनाथ-बद्रीनाथमध्ये बर्फच नाही! नासाच्या सॅटेलाईट इमेजमध्ये दिसले कोरडे-काळे डोंगर

उत्तराखंडमध्ये या वर्षी हिवाळ्याच्या ऐन हंगामातही हिमालयाच्या अनेक भागांमध्ये सामान्यपेक्षा खूप कमी हिमवर्षाव नोंदवला गेला आहे. नासाच्या सॅटेलाईट इमेजमध्ये कोरडे-काळे डोंगर दिसून आले आहेत. तुंगनाथमध्येही 1985 नंतर बर्फ पहिल्यांदा गायब झाला आहे.

साधारणपणे डिसेंबर-जानेवारी केदारनाथ-बद्रीनाथ भाग पूर्णपणे बर्फाने झाकलेले असतात, पण यावेळी परिस्थिती वेगळी आहे. केदारनाथमध्ये वर्षाच्या सुरुवातीला हिमवर्षाव नक्कीच झाला, पण तो टिकला नाही, तर बद्रीनाथमध्ये तर अजून हिमवर्षाव झालाच नाही. जागतिक तापमानवाढ आणि बदलत्या हवामान पद्धतीमुळे ही परिस्थिती उद्भवल्याचे हवामानतज्ञ सांगतात.

तुंगनाथमध्ये जानेवारीत बर्फ पडला नाही

तुंगनाथच्या उंच प्रदेशातही जानेवारीचा अर्धा महिना उलटूनही बर्फ पडला नाही, असे 1985 नंतर प्रथमच घडले आहे. ‘स्नो ड्रट’ सारखा पॅटर्न हिमालयीन प्रदेशासाठी असामान्य पण वाढता ट्रेंड मानला जात आहे.

मसुरी-नैनीतालमध्येही बर्फ नगण्य ः मसुरी, नैनीताल आणि मुत्तेश्वरसारख्या प्रसिद्ध थंड हवेच्या ठिकाणीही बर्फाचे दृश्य नगण्य राहिले. सामान्यतः पर्यटक हिवाळय़ात बर्फ पाहण्यासाठी मोठय़ा संख्येने येथे येतात, परंतु बर्फ नसल्यामुळे पर्यटन व्यवसाय आणि महसुलावर परिणाम झाला आहे. हिमवृष्टीच्या कमतरतेमुळे शेती, फळबाग, जलस्रोत आणि संपूर्ण प्रदेशाच्या पर्यावरणीय संतुलनावरही परिणाम होत आहे.

जंगलातील आगीच्या घटनाही वाढल्या

2025 मध्ये पावसाळ्यात घडलेल्या घटना पाहता गेल्या वर्षी पावसाळ्यात ढगफुटीच्या डझनभर घटना घडल्या होत्या, ज्यात मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली होती. सततच्या ढगफुटीच्या घटनांमागे हवामानातील असंतुलन हेदेखील कारण मानले गेले होते. गेल्या तीन महिन्यांत संपूर्ण उत्तराखंडमध्ये नाममात्र बर्फवृष्टी झाली आहे. दुष्काळामुळे पर्वतांवरील नंदा देवी संरक्षित वनांमध्येही आगीच्या घटना घडत आहेत. राज्य सरकारने आपत्तींमध्ये 15 हजार कोटींहून अधिक नुकसानीचा अंदाज लावला आहे. जोशीमठ औली येथून दिसणाऱ्या नंदा देवीच्या शिखरांवरही इतर वर्षांच्या तुलनेत यावेळी बर्फ कमी आहे.