
मुंबईला हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा महापौर पाहण्याची परंपरा आहे. भाजपचा किंवा गद्दारांचा महापौर होईल त्या दिवशी मुंबई शोकसागरात बुडेल, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत सोमवारी सकाळी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.
मिंधे गटाचे नगरसेवक पंचतारांकित हॉटेलमध्ये असून भाजपनेही आपल्या नगरसेवकांना इतरत्र हलवण्याचे ठरवले आहे. शिवसेनेचे नगरसेवक आपापल्या घरी असून त्यांची बैठक मातोश्रीवरच होत आहेत. आमचे नगरसेवक आपापल्या गाड्याने येतात आणि निघून जाताहेत. पण मिंधे गट आणि भाजपला त्यांचे नगरसेवक डांबून का ठेवावे लागले आहेत, याचे उत्तर त्यांनी द्यावे, असा घणाघात राऊत यांनी केला. तसेच शिंदेंचे नगसेवक डांबून ठेवले त्या हॉटेलमध्ये जेवायला जाणार का? असे विचारले असता राऊत म्हणाले की, आम्ही जेवायला जातो की आत लपवलेले पाहुणे कुठे बाहेर जेवायला जातील ते बघू.
संजय राऊत पुढे म्हणाले की, मुंबईत काँग्रेसचे नगरसेवक फुटणार नाहीत. शिवसेनेच्या नगरसेवकांचा प्रश्नच येत नाही. आता फोडाफोडीचा खेळ भाजप आणि शिंदे गटामध्ये होणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळी मजा येणार आहे. भाजपचा महापौर होऊ नये म्हणून त्यांचा सरकारी पक्ष देव पाण्यात घालून बसला आहे. आता त्या दोघांमध्ये काय होते त्याचा आधी निकाल लागू द्या, मग आम्ही आमचे देव बाहेर काढू.
मुंबईला हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा महापौर पाहण्याची परंपरा आहे. भाजपचा किंवा गद्दारांचा महापौर होईल त्या दिवशी मुंबई शोकसागरात बुडेल. मोरारजी देसाई यांनी 106 लोक मारले तो काळा दिवस आणि भाजपचा महापौर होईल तो दिवस एकच असेल, असे राऊत म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, राजकारणात बऱ्याच गोष्टी गणितावर चालत नाहीत. सध्या भाजपवाले त्यांच्या महापौर पदाबाबत बोलत असून शिंदेंकडे 30 नगरसेवक नसतानाही ते महापौर पदाच्या गोष्टी करत आहेत. आता ज्याला बनवायचा ते बनवतील, पण आम्ही अजून आहोत. टायगर अभि जिंदा है… शिवसेना आणि त्यांच्या सरकारी पक्षांजवळ सत्ताधाऱ्यांना चॅलेंज करू शकेल एवढा आकडा आहे. सध्या आम्ही फक्त मजा पाहत आहोत.



























































