
सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दुसरीकडे राज्यात परदेशी गुंतवणूक वाढवण्यासाठीची दावोस येथे चढाओढ सुरू आहे. मात्र अशातच माहिती मिळाली आहे की दावोस दौरा सोडून काही नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. दिल्लीत राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. या नेत्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली आहे.
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार दावोस दौरा रद्द करून राजधानी दिल्लीत पोहोचले आहेत. त्यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे. या भेटीनंतर शिवकुमार आणि त्यांचे बंध डी. के. सुरेश यांनी केलेल्या विधानांमुळे सस्पेन्स वाढला असून कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची खुर्ची धोक्यात आल्याचे दिसतेय.
कर्नाटकमधील सत्तासंघर्ष नव्या वर्षातही सुरू आहे. सिद्धरामय्या यांना हटवून मुख्यमंत्रीपदी शिवकुमार यांची वर्णी लावावी असा काही काँग्रेस आमदारांचा सूर आहे. शिवकुमार गटातील या आमदारांनी गेल्या वर्षी दिल्लीत काँग्रेस हायकमांडची भेटही घेतली होती. आता डावोस दौरा रद्द करून स्वत: शिवकुमार यांनी दिल्लीत धाव घेतली आहे. त्यांची काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत बैठक झाल्याचीही चर्चा आहे.
गुड न्यूज मिळणार, सस्पेन्स वाढला
यानंतर दिल्लीत पत्रकारांशी बोलताना शिवकुमार यांनी सस्पेन्स वाढवणारे विधान केले. राजधानी दिल्लीमध्ये मी कुणाला भेटलो हे जाहीर करू शकत नाही. वेळच या प्रश्नाची उत्तरे देईल, असे ते म्हणाले. याचवेळी शिवकुमार यांचे बंधू डी.के. सुरेश यांनीही एक विधान केले. योग्य वेळी आणि योग्य परिस्थितीत गोड बातमी मिळेल, असे ते म्हणाले. त्यामुळे कर्नाटकातील नेतृत्वबदलाचा पेच आता अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे दिसत असून काँग्रेस हायकमांडच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
राहुल गांधींआधी खरगेंची भेट
दरम्यान, राहुल गांधी यांची भेट घेण्याआधी शिवकुमार यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचीही भेट घेतली होती. या भेटीबाबतही गुप्तता बाळगण्यात आली होती. आता त्यांनी राहुल गांधी यांची भेट घेतल्याने कर्नाटकात नेतृत्वबदलाच्या चर्चांना पुन्हा हवा मिळाली आहे.


























































