
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) व दादर येथून ये-जा करणाऱ्या पाच एक्स्प्रेसच्या फेऱ्या लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) व पनवेल येथे हलवण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेने रेल्वे बोर्डाकडे तसा प्रस्ताव सादर केला आहे. या निर्णयामुळे मेन लाईनवरील लोकलसेवेतील एक्स्प्रेसचा अडथळा दूर होईल आणि लोकल ट्रेनचा वक्तशीरपणा सुधारेल, असा विश्वास मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
मध्य रेल्वेच्या प्रस्तावानुसार राज्यराणी, नागरकोईल, दादर-तिरुनेलवेली सुपरफास्ट, तिरुवनंतपुरम सेंट्रल एक्स्प्रेस आणि हापा दुरंतो या पाच एक्स्प्रेसच्या दहा फेऱ्या सीएसएमटी आणि दादर येथून एलटीटी आणि पनवेलला हलवण्यात येणार आहेत. सीएसएमटी-कसारा आणि सीएसएमटी-कर्जत मार्गांवर प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर करण्याच्या हेतूने मध्य रेल्वेने पाच एक्स्प्रेसच्या फेऱ्या दक्षिण मुंबईत आणण्याऐवजी एलटीटी आणि पनवेलमध्ये हलवण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास जवळपास 15 अतिरिक्त लोकल चालवण्यासाठी जागा उपलब्ध होणार आहे. तसेच गर्दीच्या वेळेत 40 ते 50 हजारांहून अधिक प्रवाशांना लोकलसेवेत सामावून घेणे शक्य होणार आहे.
एक्स्प्रेसमुळे दररोज 40 लोकलची रखडपट्टी
महाराष्ट्राबाहेरून येणाऱया एक्स्प्रेस गाडय़ा अनेकदा उशिरा येतात. त्यामुळे दररोज जवळपास 40 लोकल ट्रेनची रखडपट्टी होत आहे. हिवाळ्यात उत्तर हिंदुस्थानातील धुक्यामुळे मुंबईकडे येणाऱया गाडय़ांना आणखी उशीर होतो. याचा मोठा त्रास लोकल प्रवाशांना सहन करावा लागतो. ही समस्या दूर करण्यासाठी मध्य रेल्वेने पाच एक्स्प्रेसच्या फेऱया एलटीटी आणि पनवेलला हलवण्याची योजना आखली आहे.


























































