
मुंबईचे भूमिपुत्र असलेल्या कोळी समाजासाठी आयुष्यभर लढा देणारे कोळी समाजाचे ज्येष्ठ नेते रामकृष्ण केणी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. कोळी समाजाच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढा देणाऱ्या केणी यांनी साहित्य, नाटक आणि राजकारणाच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचे काम केले. रामकृष्ण केणी हे शिवसेनेचे निष्ठावंत सैनिक होते.
रामकृष्ण केणी हे केवळ राजकीय नेते नव्हते, तर ते विचारवंत, साहित्यिक आणि समाजाच्या वेदनांना शब्द देणारे प्रभावी नाटककार होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित ‘युगपुरुष’ हे नाटक रंगमंचावर आणून त्यांनी दलित, वंचित आणि कोळी समाजाला सांस्कृतिक व्यासपीठावर आवाज दिला. अन्यायाविरुद्ध उभे राहणे, शोषितांच्या बाजूने निर्भीडपणे बोलणे हीच त्यांची ओळख होती. धारावी विभागातून ते दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. मुंबई महानगरपालिकेत त्यांनी सभागृह नेते म्हणूनही जबाबदारी सांभाळली होते. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील कोळी समाज एकत्र यावा, संघटित व्हावा आणि आपल्या हक्कांसाठी लढावा यासाठी त्यांनी असंख्य आंदोलने केली. महाराष्ट्रातील विविध समाज संघटनांची शिखर संस्था असलेल्या कोळी महासंघाचे ते संस्थापक होते.


























































