…आता मला थांबायचंय! भाजप आमदार संदीप जोशी यांचा राजकारणाला रामराम; सत्तेसाठी पक्षांतरांमुळे निष्ठावंत कार्यकर्ते अस्वस्थ आहेत!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आमदार आणि नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी यांनी राजकारणाला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. संदीप जोशी यांची विधान परिषदेची मुदत 31 मे 2026 रोजी संपत आहे. यानंतर ते राजकारणातून पूर्णपणे निवृत्त होणार आहेत. ‘आता मला थांबायचंय!’ असं एक भावनिक पत्र लिहीत जोशी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

राजकारण ही माझ्यासाठी नेहमीच पद किंवा प्रतिष्ठेपेक्षा वेगळी, समाजसेवेची आणि निष्ठेची वाट होती. मात्र आज सत्तेसाठी सुरू असलेले पक्षांतर, संधीसाधूपणा आणि वाढलेली स्पर्धा सामान्य मतदारांसह निष्ठावान कार्यकर्त्यांनाही अस्वस्थ करत आहे. मर्यादित जागा आणि वाढलेल्या अपेक्षांमुळे पुणीच थांबायला तयार नाही ही वस्तुस्थिती आहे. मी आता 55 वर्षांचा झालो आहे. स्वतःची जागा रिक्त करणं आणि तरुण रक्ताला समोर जाऊ देणं हेसुद्धा आवश्यक असल्याने मी आता निवृत्त होत असल्याचे ते म्हणाले.

सामान्य कार्यकर्त्यावर अन्याय नको

राजकारणात राहिलो तर पुढेही संधी मिळतील याची मला खात्री आहे. कारण एक सामान्य कार्यकर्ता देशाचा पंतप्रधान बनू शकतो हे केवळ भाजपमध्ये शक्य आहे. मात्र माझ्या असण्यामुळे पुठल्याही सामान्य कार्यकर्त्यावर अन्याय होऊ नये हे माझे प्रामाणिक मत आहे. म्हणूनच मी हा निर्णय घेत आहे, असे आमदार संदीप जोशी यांनी स्पष्ट केले आहे.