धनगर समाजाच्या आंदोलनाला पोलिसांची मनाई; तातडीने सुनावणीस हायकोर्टाचा नकार

आझाद मैदानात धनगर समाजाच्या आंदोलनास पोलिसांनी परवानगी नाकारली. याविरोधात याचिका दाखल झाली आहे. या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सोमवारी उच्च न्यायालयाने नकार दिला. 21 जानेवारीला हे आंदोलन होणार आहे. त्यामुळे या याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी घ्यावी, अशी विनंती न्या. रवींद्र घुगे व न्या. अभय मंत्री यांच्या खंडपीठासमोर करण्यात आली. त्यास न्यायालयाने नकार दिला. ही सुनावणी 28 जानेवारीला होईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

अमुक दिवशीच आंदोलन का?

तुम्हाला अमुक दिवशीच आंदोलन का करायचे आहे. वर्षातील 365 दिवसांपैकी कोणत्याही दिवशी तुम्ही आंदोलन करू शकता, असे न्यायालयाने नमूद केले.

काय आहे प्रकरण…

जालना येथील दीपक बोर्डे यांनी अॅड. असीम सरोदे यांच्यामार्फत ही याचिका केली आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आझाद मैदानात आंदोलन करायचे आहे. यासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली. आम्ही शांततेत आंदोलन करणार आहोत. या आंदोलनाला परवानगी देण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.