घराची खोटी जाहिरात करून फसवणूक करणारी टोळी गजाआड

सोशल मीडियावर घराची खोटी जाहिरात टाकून फसवणूक करणाऱ्या टोळीला मालाड पोलिसांनी बेड्या ठोकल्या. हितेश केदारी, राजेश प्रसाद, निमेश मावानी, मोहम्मद रफिक रशीद खान, दीपक किरीट शाह, राजन ककडं अशी त्यांची नावे आहेत. एक जण फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

तक्रारदार हे मालाड येथे राहतात. त्यांना घर घ्यायचे होते. त्यामुळे त्यांनी एका साईटवर जाऊन माहिती सर्च केली. नोव्हेंबर ते डिसेंबर 2025 या काळात एकाने तक्रारदार यांना संपर्क केला. त्यानंतर मालाड येथील एका इमारतीची माहिती दिली. चर्चेनंतर दोन जण हे तक्रारदार यांना घेऊन घर पाहण्यासाठी घेऊन गेले. घर दाखवल्यावर सौदा ठरला. तक्रारदार यांनी ते विकत घेण्याची इच्छा दर्शवली. इच्छा दर्शवल्यानंतर दीपकने त्या रूम मालकाची भेट घडवून आणली. त्यांच्यात झालेल्या चर्चेनंतर घर 1 कोटी 10 लाख रुपयांत घेण्याचे ठरले. त्यानुसार तक्रारदार यांनी 26 लाख रुपये चेक आणि चार लाख रुपये रोखीने दिले. ठरल्यानुसार तक्रारदार यांनी एकाला संपर्क केला. तेव्हा तो टाळाटाळ करू लागला. त्यामुळे तक्रारदार यांनी त्या सोसायटीमध्ये जाऊन चौकशी केली तेव्हा चित्रीकरणात दिसत असलेला व्यक्ती हा घर मालक नसल्याचे त्यांना समजले.

फसवणूक झाल्याप्रकरणी त्यांनी मालाड पोलीस ठाण्यात धाव घेतली. सहाय्यक आयुक्त प्रकाश बागल यांनी अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक डी. चव्हाण यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक संजय बेंडवाल, सहाय्यक निरीक्षक दीपक रायवाडे, उपनिरीक्षक निळोबा जक्कलवाड, जुवाटकर, फर्नांडिस, गोंजारी, वाघ, शेरे, राणे, बाबर आदींच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांचे पथक बँकेत गेले. ज्या खात्यात पैसे जमा झाले होते, त्याची माहिती काढली. पोलिसांनी दोन दिवस सापळा रचून हितेश केदारीला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीनंतर पोलिसांनी डिलिव्हरी बॉय राजेश प्रसादला ताब्यात घेऊन अटक केली. राजन ककड, मोहम्मद रफिक खान आणि फरार आरोपीच्या सांगण्यावरून हितेशने बँक खात्याचा वापर केला. त्याच्या खात्यात 26 लाख रुपये जमा झाले होते. पोलिसांनी मीरा रोड येथून राजनला अटक केली, तर खोटे नाव सांगून घर मालक म्हणून भासवणाऱ्या निमेश मेवाणीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या टोळीच्या अटकेने दहिसर आणि काशिगाव येथील गुह्याची उकल करण्यात मालाड पोलिसांना यश आले आहे.