पालघर-जव्हार-त्र्यंबकेश्वर-घोटी रस्ता झाला मृत्यूचा सापळा; महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांचा कानाडोळा

पालघर जव्हार – त्र्यंबकेश्वर ते घोटी सिन्नर हा १६० क्रमांकाचा महामार्ग प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी प्रचंड खड्डे पडले असून महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे सपशेल कानाडोळा केला असून या रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम म्हणजे ठेकेदारासाठी नोटा छपाईचे मशीन बनले आहे. थातूरमातूर काम केल्याचे दाखवून कंत्राटदार पैसे उकळत आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यालय संपूर्ण पालघर जिल्ह्यात कुठेही नसल्याने तक्रार करायची तर कुणाकडे, असा संतप्त सवाल जव्हारवासीयांनी विचारला आहे.

पालघर ते सिन्नर हा महामार्ग पालघर-जव्हार-त्र्यंबकेश्वरमधील रहिवाशांसाठी प्रवासाची जीवनवाहिनी आहे. मात्र हा रस्ता पूर्णपणे उखडला गेला असल्याने त्यावरून जीवमुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या रस्त्याचे डांबर पुरते नष्ट होऊन सगळी खडी वर आल्याने अनेक अपघात होत आहेत. जव्हार शहरापासून एक किमी अंतरावरील बायफ कार्यालय, बोरीचे वाकण, या वळणावर प्रचंड मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावर खड्ड्यांचा अंदाज न आल्याने एक दुचाकीस्वार घसरला, मागे बसलेली त्याची गर्भवती पत्नीही फेकली गेली. त्यामुळे तिचा हात मोडला. हा अपघात केवळ महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला.

बाजार, दवाखान्याचा रस्ता
जव्हार-नाशिक हा राज्यमार्ग असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी सुरू असते. जव्हारमधील गावकऱ्यांचा बाजारहाट आणि उपचारासाठी नाशिकच्या दवाखाने आणि रुग्णालयात जावे लागते. त्यामुळे या रस्त्यावरील खड्डे तत्काळ भरले जावेत, अशी मागणी जव्हारवासीयांनी केली आहे. याबाबत ठाणे कार्यालयातील राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अभियंता ज्योती शिंदे यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.