तरुणपणीच स्वतःला झोकून द्या, मगच यश मिळेल; ऋषभ पंतचा सल्ला

तरुण वय हे संयम पाळण्यासाठी नसून अथक परिश्रमांसाठी असते, असे मत हिंदुस्थानचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतने व्यक्त केले आहे. सुरुवातीच्या काळात आपल्या सीमा ओलांडून मेहनत करणे, हेच भविष्यातील यशाचा पाया असल्याचे त्याने सांगितले. एसबीआय लाईफने ‘जॉली आणि पॉली’ ही नवीन जाहिरात मोहीम लॉन्च केली असून यासाठी ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजाची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली. या कार्यक्रमावेळी तो बोलत होता.

पंत पुढे म्हणाला की, माझ्या मनात फक्त हिंदुस्थानसाठी खेळण्याचे स्वप्न होते, बाकी सर्व गोष्टी या प्रवासातील ब्राय प्रोडक्ट आहेत, असेही पंत म्हणाला. यावेळी त्याने लहानपणी वडिलांचे छत्र हरवल्याने जबाबदारीची जाणीव झाल्याचेही म्हटले. तसेच कोरोना महामारीच्या काळात त्याला आयुष्याकडे आणि क्रिकेटकडे बघण्याचा एक गंभीर दृष्टिकोन मिळाला, असेही पंत म्हणाला. भविष्य सूकर व्हावे म्हणून प्रत्येकाने विमाही उतरवला पाहिजे, असेही त्याने अपघाताची घटना आठवत सांगितले.

तरुणांनी आधी आपल्या कामासाठी वेडे व्हायला हवे. सुरुवातीला प्रचंड मेहनत करा, मगच आयुष्यात आरामाची वेळ येईल. तरुणपणात प्रयोग करण्याची आणि अपयशातून सावरून पुन्हा उभे राहण्याची मोठी संधी असते, असेही पंतने म्हटले. तसेच वयाची 35 किंवा 45 वर्षे ओलांडल्यानंतर माणूस सुरक्षिततेचा विचार करतो, त्यामुळे त्याआधी केवळ कठोर मेहनत करण्यावर भर द्यावा, असा सल्ला त्याने तरुणांना यावेळी दिला.