
मुंबईचे महापौरपद हे भाजपकडेच राहील. कोणत्याही परिस्थितीत त्याबाबत तडजोड होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाने घेतली आहे. महानगरपालिका निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या दबावापुढे न झुकता सत्तास्थापनेच्या तयारीला लागण्याच्या सूचना राज्यातील नेत्यांना दिल्या आहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून नगरसेवकांना हॉटेल मुक्कामी ठेवून दबावाचे राजकारण करणाऱ्या शिंदे गटावर नगरसेवकांना घरी सोडण्याची नामुष्की ओढवली आहे.
मुंबईच्या महापौर पदासाठी भाजपने बराच काळ प्रतीक्षा केली. 89 जागा जिंकल्यामुळे महापौर पदावर भाजपचाच हक्क अशी स्पष्ट भूमिका महायुतीचा घटक पक्ष असणाऱ्या शिंदे गटासमोर स्पष्टपणे मांडा. मुंबई महापालिकेतील अन्य पदे आणि अन्य महापालिकांमधील सत्तेच्या वाटपाबाबत शिंदे गट, अजित पवार गट यांच्याशी सन्मानजनक तोडगा काढून राज्यातील जास्तीत जास्त महापालिकांत महायुतीची सत्ता कशी येईल याकडे लक्ष द्या, अशा सूचना दिल्लीत गेलेल्या राज्यातील नेत्यांना भाजप नेतृत्वाने दिल्या आहेत.
बेस्ट समिती शिंदे गटाला?
शिंदे गटाने पहिली अडीच वर्षे मुंबईचे महापौरपद आणि दोन वर्षे स्थायी समितीचे अध्यक्षपद देण्याची मागणी केली होती; पण भाजपने त्यांची मागणी फेटाळून लावली आहे. उपमहापौर पद आणि एखाद् दुसरी समिती शिंदे गटाला दिली जाईल. फार फार तर उपमहापौर पदाबरोबर एखाद्-दोन वर्षे बेस्ट समितीचे अध्यक्षपद दिले जाईल, असा प्रस्ताव भाजपने शिंदे गटासमोर ठेवल्याची चर्चा आहे.
नगरसेवकांच्या गट नोंदणीसाठी हालचाल
महापालिका कायद्यांतर्गत गट स्थापन होण्यापूर्वी नगरसेवक पक्ष बदलू शकतात; परंतु एकदा गटाची नोंदणी झाली तर पक्षांतराला आळा बसतो. त्यानंतर एकतृतीयांश नगरसेवक वेगळे झाले तरच फूट पाडणे शक्य होते. त्यामुळे शिंदे गटाकडून नगरसेवकांच्या गटाची नोंदणी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
शिंदे गटात अस्वस्थता
निवडणुकीचा निकाल लागल्याच्या दुसऱ्याच दिवशी हॉटेल मुक्कामी बोलावून काsंडून ठेवल्यामुळे शिंदे गटातील नगरसेवकांत अस्वस्थता आहे. पक्षाच्या आदेशानुसार हॉटेलवर आल्यावरही नेतृत्वाकडून अविश्वास दाखविला जात असल्याने काही नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. ही नाराजी वाढू नये यासाठी विविध कारणे देऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न शिंदे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे.
मिंध्यांच्या नगरसेवकांनी अखेर हॉटेल सोडले
नव्या नगरसेवकांचे शिबीर असल्याचे सांगून निकालाच्या दुसऱ्याच दिवशी शिंदे गटाच्या नगरसेवकांना ताज लँडस् एंड
हॉटेलमध्ये मुक्कामी ठेवण्यात आले होते; मात्र पडद्यामागे शिंदे गटाकडून महापौरपदासाठी दबावाचे राजकारण सुरू होते. याची गंभीर दखल घेत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने महापौरपदाबाबत तडजोड नाही, असा स्पष्ट संदेश देताच या नगरसेवकांना अखेर घरी सोडण्यात आले.
प्रमाणपत्र, आधार कार्ड ताब्यात
शिवसेनेसोबत गद्दारी करून भाजपसोबत गेलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांना आपले नगरसेवक फुटण्याची भीती वाटत आहे. त्यामुळे नगरसेवकांना हॉटेलमधून बाहेर सोडताना त्यांचे नगरसेवक म्हणून निवडून आल्याचे प्रमाणपत्र, आधार कार्ड आदी मूळ दस्तावेज शिंदे गटाने ताब्यात घेतले आहेत.































































