
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झालेले नितीन नबीन यांनी आज कार्यभार स्वीकारला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नबीन यांचे अभिनंदन केले. ‘मी भाजपचा एक कार्यकर्ता आहे. नितीन नबीन हे पक्षात माझे बॉस असतील,’ असे मोदी यावेळी म्हणाले.
दिल्लीतील भाजप मुख्यालयात नबीन यांनी पदभार स्वीकारला. त्यांचे अभिनंदन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘नबीन यांचे नेतृत्व हे अनुभव आणि नाविन्याचा संगम आहे. रेडिओ ते एआय असा त्यांचा प्रवास आहे. फक्त भाजपच नाही, तर एनडीएच्या समन्वयाची जबाबदारीही त्यांच्यावर असेल.’
ही लोकशाहीचा कुठला प्रकार?, काँग्रेसचा बोचरा टोला
‘भाजपमधील लोकशाही हा केवळ दिखावा आहे. त्यांचे सर्व निर्णय बंद दाराआड होतात. आधी अध्यक्षांच्या नावाची घोषणा केली. नंतर निवडणूक घेणार असे सांगितले गेले. प्रत्यक्षात निवडणूक झालीच नाही. निवडणुकीच्या आधीच अध्यक्षाचे नाव निश्चित करणे हा लोकशाहीचा कुठला प्रकार आहे?,’ असा सवाल काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांनी केला.



























































