
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे धमकीसत्र सुरूच असून आता त्यांनी फ्रान्सला टॅरिफची धमकी दिली आहे. ‘बोर्ड ऑफ पीस’मध्ये सहभागी न झाल्यास फ्रेंच वाईन व शॅम्पेनवर 200 टक्के टॅरिफ लावू, अशी धमकी ट्रम्प यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना दिली आहे.
पॅलेस्टाईनमधील युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेने एक योजना आखली आहे. त्यासाठी ‘बोर्ड ऑफ पीस’ या गटाची स्थापना केली आहे. यात सहभागी होण्याचे आवाहन ट्रम्प यांनी हिंदुस्थान, पाकिस्तान, रशियासह अनेक देशांना केले आहे. फ्रान्सने त्यास नकार दिला आहे. त्यामुळे संतापलेल्या ट्रम्प यांनी फ्रान्सला 200 टक्के टॅरिफची धमकी दिली आहे.
मॅक्रॉन म्हणाले, खपवून घेणार नाही!
ट्रम्प यांच्या टॅरिफच्या धमकीवर इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी संताप व्यक्त केला आहे. ‘‘आम्ही आमच्या देशाचे परराष्ट्र धोरण बदलावे म्हणून टॅरिफच्या धमक्या देणे हे अजिबात खपवून घेतले जाणार नाही. या धमक्यांचा काही उपयोग होणार नाही,’’ असे मॅक्रॉन म्हणाले.


























































