हिंदुस्थानच्या बॅडमिंटनचे ‘सायना पर्व’ निवृत्त, गुडघ्याच्या दुखापतीमुळे रॅकेट ठेवण्याचा निर्णय

हिंदुस्थानच्या बॅडमिंटनला जागतिक नकाशावर मानाचे, अभिमानाचे स्थान मिळवून देणारी ‘बॅडमिंटन क्वीन’ सायना नेहवालने अखेर स्पर्धात्मक बॅडमिंटनमधून निवृत्तीची घोषणा करत आपल्या झुंजार कारकीर्दीला पूर्णविराम दिला. ही घोषणा म्हणजे केवळ एका खेळाडूची निवृत्ती नाही, तर हिंदुस्थानच्या क्रीडाजगताच्या एका सुवर्ण अध्यायावर पडलेली शेवटची रेघ आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून गुडघ्याच्या दुखापतींशी झुंज देणाऱया सायनाने मनातील वेदना शब्दांत मांडल्या. “शरीर आता साथ देत नाही,’’ असे सांगताना तिच्या शब्दांआड दडलेली असहायता स्पष्ट जाणवते. गेल्या दोन वर्षांपासून गुडघ्याच्या जुनाट समस्येमुळे ती त्रस्त होती. 2023 च्या सिंगापूर ओपनमधील सामना हा तिच्या कारकीर्दीतील अखेरचा ठरला.

एका पॉडकास्टमध्ये बोलताना सायनाने प्रामाणिक कबुली दिली, “माझ्या गुडघ्याची दुखापत गंभीर असून मला संधिवात झाला आहे. सर्वोत्तम खेळासाठी दिवसाला 8 ते 9 तास सराव आवश्यक असतो. पण माझा गुडघा अवघ्या एक-दोन तासांतच साथ सोडायचा, सूजही यायची. अशा वेळी थांबणेच योग्य वाटले.’’ 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकत इतिहास घडवणारी सायना ही ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन पदक जिंकणारी पहिली हिंदुस्थानी खेळाडू ठरली. 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमधील दुखापतीनंतरही तिने हार मानली नाही. 2017 मध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य, तर 2018 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत तिने पुन्हा एकदा आपली जिद्द सिद्ध केली.