
नदीशेजारील भागातून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे इंद्रायणी नदी सातत्याने फेसाळत असून प्रदूषणाचे हे चित्र आता अधिकच भयावह झाले आहे. गेल्या काही दिवसांत नदीतील फेसाचे प्रमाण वाढल्याने पाण्यातील माशांचा मृत्यू झाला आहे. तसेच, या रसायनमिश्रित सांडपाण्यामुळे नदीकाठी तीव्र दुर्गंधी पसरली असून, इंद्रायणी काठच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परिसरातून जातानाही दुर्गंधी येत असून याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.
लोणावळ्याच्या डोंगररांगांत उगम पावणारी आणि देहू–आळंदीसारख्या तीर्थक्षेत्रांना पावन करणारी इंद्रायणी नदी सध्या औद्योगिक प्रदूषण, नागरी सांडपाणी आणि निष्काळजी मानवी हस्तक्षेपामुळे अस्तित्वाच्या संकटात सापडली आहे. पिंपरी–चिंचवड, चाकण, तळेगाव आणि पीएमआरडीए हद्दीतील औद्योगिक क्षेत्रांमधून कोणतीही प्रक्रिया न करता सोडले जाणारे सांडपाणी थेट नदीत मिसळत आहे. परिणामी नदीचे नैसर्गिक, निर्मळ स्वरूप नष्ट होऊन पाणी काळवंडले असून अनेक ठिकाणी हिरवट-पिवळसर रंगाचा फेस पसरलेला दिसत आहे. नदीत मिसळणाऱ्या रसायनयुक्त पाण्यामुळे इंद्रायणीतील प्राणवायूची पातळी लक्षणीयरीत्या घटली आहे. त्यामुळे मासे आणि इतर जलचरांचा मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, पूर्वी नदीतील मासे पाण्याची स्वच्छता राखण्यास मदत करत असत. मात्र औद्योगिक रसायनांच्या माऱ्यामुळे केवळ माशांचाच नाही, तर मासे खाणाऱ्या बगळ्यांसारख्या पक्ष्यांचाही मृत्यू होत असल्याचे चित्र काही भागांत दिसून आले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ (एमपीसीबी) आणि संबंधित प्रशासनाकडून नेमक्या कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत, याबाबत स्थानिक नागरिकांनी गंभीर सवाल उपस्थित केले आहेत. नदी स्वच्छतेच्या नावाखाली वर्षानुवर्षे केवळ बैठका, पाहण्या आणि कागदी योजना होत असल्याचा आरोप आहे. प्रत्यक्ष अंमलबजावणी, कठोर दंड आणि सांडपाण्यावर त्वरित नियंत्रणाचा अभाव असल्याने इंद्रायणीचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे.
…सांडपाणी थेट नदीत; दुर्गंधीचा विळखा
पिंपरी–चिंचवड महानगरपालिका तसेच नदीकाठच्या ग्रामपंचायती व नगरपरिषदांचे सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट इंद्रायणी नदीत सोडले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाला देखील ही बाब अवगत आहे. दुर्गंधीने परिसर अक्षरशः ग्रासला आहे. यामुळे त्वचारोग, श्वसनाचे विकार, पोटाचे आजार वाढत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत.
प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या पथकाने आळंदी येथे भेट देऊन पाहणी केली आहे. येथील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले असून त्याचा अहवाल प्रलंबित आहे.
– नवनाथ अवताडे, उप प्रादेशिक अधिकारी, एमपीसीबी.































































