लाल वादळात जर भगवं वादळ मिसळलं तर महाराष्ट्राच्या सरकारला फार मोठं आव्हान उभं राहिल, संजय राऊत यांचा इशारा

पालघरमध्ये गुजराती फलक लावले जात असून आदिवासी मराठी वाचू शकत नाहीत का, असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. तसेच लाल वादळात जर भगवं वादळ मिसळलं तर महाराष्ट्राच्या सरकारला फार मोठं आव्हान उभं राहिल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, पालघरचा हा विषय भूमिपुत्रांच्या हक्कांचा विषय आहे. जमीन, जंगल, पाणी आणि समुद्र वाचवण्यासाठी सुरू असलेली ही लढाई आहे. पालघरमध्ये गुजराती फलक लावले जात असून आदिवासी मराठी वाचू शकत नाहीत का? असा सवाल त्यांनी केला. आदिवासींची भाषा मराठी असून ही लढाई सांस्कृतिक आक्रमणाविरोधात आहे, असे ते म्हणाले. वाढवण बंदराच्या नावाखाली निसर्गसंपत्तीची लूट होत असून त्याचा फटका शेवटी आदिवासी बांधवांनाच बसेल. काल लाल वादळ होतं त्या लाल वादळात जर भगवं वादळ मिसळलं तर महाराष्ट्राच्या सरकारला फार मोठं आव्हान उभं राहिल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले की, मोदी स्वतःला प्रधान सेवक म्हणवतात, पण प्रधान सेवकासारखे वागत नाहीत. लाखो रुपयांचे कपडे, गॉगल, पेन आणि विशेष विमानातून पंचतारांकित सुविधांसह परदेश दौरे करणारा प्रधान सेवक जनसेवक कसा, असा सवाल त्यांनी केला.

नितीन नबीन यांच्या संदर्भात बोलताना राऊत म्हणाले की, ते अध्यक्ष झाले असले तरी त्यांना खरे अधिकार आणि स्वातंत्र्य आहे का, हा प्रश्न आहे. खुर्चीवर अनोळखी चेहरा बसवून मागून सूत्रे हलवण्याची सवय नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची आहे. नितीन नबीन सामान्य घरातील कार्यकर्ता नाहीत. त्यांचे वडील मोठे नेते आणि मंत्री होते आणि घराणेशाहीतूनच ते पुढे आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

पक्षांतर आणि अपात्रतेच्या प्रकरणावर बोलताना संजय राऊत यांनी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावरही गंभीर आरोप केले. संविधानानुसार तीन वर्षे तीन महिन्यांत निर्णय व्हायला हवा होता, पण अद्याप तारीख पे तारीख सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयावर राजकीय दबाव असल्याचा आरोप करत त्यांनी म्हटले की, निवडणूक आयोगानेही दिल्लीच्या दबावाखाली निर्णय दिला. आज अंतिम युक्तिवाद सुरू होणार असून निर्णयाची वाट पाहत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘‘जनतेला सर्व काही माहीत आहे, पण न्याय मिळेल की नाही, हा प्रश्न आहे,’’ असेही त्यांनी स्पष्ट केले.