दिशादर्शक फलकाअभावी मुंबई–गोवा महामार्गावर अपघात; कंटेनरचा पुढील भाग पुलावर तुटून पडला

मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वरजवळील जाखमाता मंदिरासमोर महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने दिशादर्शक फलक लावला नाही. परिणामी कंटेनर चालकाला मार्गाचा अंदाज न आल्याने गंभीर अपघात झाला. पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास कंटेनर थेट पुलावर चढला आणि पुढील भाग तुटून पडला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र कंटेनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सध्या मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे. मात्र या कामादरम्यान अनेक ठिकाणी दिशादर्शक फलक तसेच पूर्वसूचना फलक नसल्याचे चित्र आहे. मुंबईहून रत्नागिरीकडे जाणारा कंटेनर जाखमाता परिसरातील मारुती मंदिराजवळ महामार्गावरून पुढे जात असताना, चढाव व पुलाच्या सुरू असलेल्या कामामुळे चालकाचा अंदाज चुकला. परिणामी कंटेनरचा पुढील भाग सिमेंट अडथळ्यांवर आपटून तुटून खाली पडला आणि वाहन पुलाच्या कडेला अडकून राहिले.

अपघातानंतर काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. चौपदरीकरणाचे काम धोकादायक अवस्थेत सुरू असून आवश्यक त्या दिशादर्शक व इशारा फलकांची कमतरता असल्याने अशा घटना घडत असल्याबाबत वाहनचालक व स्थानिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. संबंधित यंत्रणांनी तातडीने योग्य दिशादर्शक, रिफ्लेक्टर, बॅरिकेट्स आणि पूर्वसूचना फलक लावावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.