
एआय क्षेत्रातील वाढती स्पर्धा पाहता, एलॉन मस्क यांच्या ‘xAI’ या स्टार्टअप कंपनीने तंत्रज्ञान जगतात एकच खळबळ उडवून दिली आहे. जगभरातील दिग्गज टेक कंपन्यांमध्ये सध्या सर्वोत्तम इंजिनिअर्सना आपल्याकडे खेचण्यासाठी मोठी चढाओढ सुरू आहे. या स्पर्धेत आघाडी घेण्यासाठी मस्क यांनी ‘टॅलेंट इंजिनिअर’ (Talent Engineer) या नावाचे एक अनोखे पद निर्माण केले आहे. या पदावरील व्यक्तीला केवळ स्वतः तांत्रिकदृष्ट्या सक्षम असून चालणार नाही, तर जगातील सर्वात हुशार सॉफ्टवेअर आणि एआय इंजिनिअर्सना शोधून त्यांना कंपनीत आणण्याचे महत्त्वाचे काम करावे लागणार आहे.
Talent Engineer या विशेष पदासाठी मस्क यांनी पगारही तितकाच मोठा दिला आहे. मस्क यांनी दिलेले मानधन सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. या कामासाठी निवडल्या जाणाऱ्या उमेदवाराला वार्षिक तब्बल 2.1 कोटी ते 4.2 कोटी रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. याशिवाय कंपनीकडून स्टॉक ऑप्शन्स आणि इतर आकर्षक बोनसही मिळण्याची शक्यता आहे. मस्क यांच्या मते, जर एखादी व्यक्ती कंपनीसाठी सर्वोत्तम कर्मचारी शोधून आणत असेल, तर तिला इतकी मोठी रक्कम देणे हे कंपनीच्या भविष्यातील प्रगतीसाठी एक फायदेशीर गुंतवणूक ठरेल, असे मस्क यांनी म्हटले आहे.
टॅलेंट इंजिनिअर म्हणजे काय ?
एलॉन मस्क यांच्या मते ‘टॅलेंट इंजिनिअर’ म्हणून काम करणे हे केवळ ऑफिसपुरते मर्यादित नसून ते अत्यंत आव्हानात्मक काम असणार आहे. या व्यक्तीला गुगल, मेटा आणि ओपनएआय (OpenAI) सारख्या बड्या कंपन्यांमधील हाय प्रोफाइल इंजिनिअर्सवर लक्ष ठेवावे लागेल. विविध टेक कॉन्फरन्स, नेटवर्किंग इव्हेंट्स आणि कोडिंग स्पर्धांच्या माध्यमातून या ‘एलिट’ इंजिनिअर्सना भेटून त्यांना xAI मध्ये सामील होण्यासाठी प्रोत्साहित करावे लागेल. हे या ‘टेक्निकल हंटर’चे मुख्य काम असेल. थोडक्यात, ज्यांच्याकडे तांत्रिक गोष्टींची योग्य समज आणि माणसे पारखण्याची उत्तम कला आहे, त्यांच्यासाठी मस्क यांनी करोडपती होण्याची ही सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे.


























































