
अदानी समूहाने विमानवाहतूक, स्वच्छ ऊर्जा, शहरी पायाभूत सुविधा, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि प्रगत उत्पादन क्षेत्रात रुपया 6 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचा आराखडा जाहीर केला आहे. ही गुंतवणूक हिंदुस्थानच्या विकास प्राधान्यांशी सुसंगत अशा मोठ्या प्रमाणावरील खासगी भांडवली गुंतवणुकीच्या नव्या टप्प्याचे संकेत देणारी असल्याचे समूहाने स्पष्ट केले आहे.
हिंदूने याबाबत वृत्त दिले आहे. दावोस येथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या (World Economic Forum – WEF) 56व्या वार्षिक परिषदेत अदानी समूहाने ही माहिती सादर केली. ही गुंतवणूक महाराष्ट्र, आसाम आणि झारखंड या राज्यांमध्ये होणार असून, स्वतंत्र मालमत्ता उभारणीऐवजी एकात्मिक, तंत्रज्ञानाधारित पायाभूत सुविधा प्लॅटफॉर्मकडे समूहाचा धोरणात्मक कल असल्याचे यातून स्पष्ट होते.
आसाममध्ये विमानवाहतूक आणि नवीकरणीय ऊर्जेवर भर
आसाममध्ये अदानी समूहाने गुवाहाटीतील लोकप्रिया गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाभोवती केंद्रित विस्तारित विमानवाहतूक व एअरोस्पेस परिसंस्थेचा तपशील मांडला. या विमानतळावरील नव्या टर्मिनलचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर 2025 मध्ये केले असून, ते पुढील महिन्यात कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.
या योजनेत हॉस्पिटॅलिटी आणि रिटेल पायाभूत सुविधा, लेव्हल-डी फुल-फ्लाइट सिम्युलेटरसह विमान प्रशिक्षण अकादमी, तसेच नॅरो-बॉडी आणि वाइड-बॉडी विमानांसाठी मेंटेनन्स, रिपेअर अँड ओव्हरहॉल (MRO) सुविधा उभारण्याचा समावेश आहे. यामुळे ईशान्य हिंदुस्थानसाठी गुवाहाटी हे प्रादेशिक विमानवाहतूक केंद्र म्हणून विकसित होणार आहे.
याशिवाय, कार्बी आंगलाँग आणि दिमा हसाओ जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प उभारले जाणार असून, त्यातून 2,700 मेगावॅटपेक्षा अधिक सौरऊर्जा क्षमता जोडली जाणार आहे. बांधकाम क्षेत्रासाठी पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी सिमेंट उत्पादन आणि ग्राइंडिंग युनिट्स उभारण्याचाही या गुंतवणुकीत समावेश आहे.
महाराष्ट्रात शहरी पुनर्विकास आणि अत्याधुनिक ऊर्जा प्रकल्प
महाराष्ट्रातील अदानी समूहाच्या गुंतवणुकीचा केंद्रबिंदू शहरी पुनर्विकास, डिजिटल पायाभूत सुविधा आणि पुढील पिढीची ऊर्जा प्रणाली असणार आहे.
यामध्ये मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्प, 25 डिसेंबर रोजी कार्यान्वित झालेला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि त्यास पूरक लॉजिस्टिक्स, व्यावसायिक आणि हॉस्पिटॅलिटी परिसंस्था यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील गुंतवणूक आराखड्यात पुढे 3,000 मेगावॅट क्षमतेची हरित डेटा सेंटर पार्क्स, विमानतळाजवळील एकात्मिक अरेना जिल्हा, 8,700 मेगावॅट क्षमतेचे पंप्ड स्टोरेज जलविद्युत प्रकल्प, कोळसा वायूकरण उपक्रम, सेमिकंडक्टर आणि डिस्प्ले उत्पादन प्रकल्प, तसेच खासगी क्षेत्राच्या सहभागासाठी सरकारच्या बदलत्या धोरणांशी सुसंगत अणुऊर्जा प्रकल्प यांचाही समावेश आहे.
रोजगार, कौशल्यविकास आणि राष्ट्रीय प्राधान्यांशी सुसंगतता
अदानी समूहाने स्पष्ट केले की, ही प्रस्तावित गुंतवणूक रोजगारनिर्मिती, कौशल्यविकास आणि तंत्रज्ञानाधारित समावेशक वाढीस चालना देणारी आहे. तसेच ही गुंतवणूक ऊर्जा संक्रमण, उत्पादन क्षेत्रातील स्वयंपूर्णता आणि प्रादेशिक विकास यांसारख्या राष्ट्रीय प्राधान्यांशी सुसंगत आहे.
दावोस येथे जागतिक राजकीय आणि उद्योगजगताचे नेते विकास, लवचिकता आणि शाश्वततेवर चर्चा करत असताना, अदानी समूहाच्या या घोषणांनी मोठ्या पायाभूत सुविधा प्लॅटफॉर्म आणि दीर्घकालीन खासगी भांडवल हिंदुस्थानच्या आर्थिक विस्ताराच्या पुढील टप्प्यात कशी महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत, हे अधोरेखित केले आहे.
महाराष्ट्रात गुंतवणूक
जागतिक आर्थिक परिषदेच्या वार्षिक बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह राज्य सरकारच्या विविध विभागांचे प्रतिनिधी दावोस येथे उपस्थित आहेत. परिषदेतल्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारला विविध क्षेत्रांतील गुंतवणुकीसंदर्भात एकूण 19 सामंजस्य करार करण्यास आले आहेत.
हरित ऊर्जा, अन्नप्रक्रिया, पोलादनिर्मिती, माहिती तंत्रज्ञान, डेटा सेंटर, वाहन उद्योग, विद्युत वाहन तसेच जहाजबांधणी अशा विविध क्षेत्रांमध्ये ही गुंतवणूक होणार आहे. या गुंतवणुकीमुळे मुंबईसह रत्नागिरी, पालघर, गडचिरोली आणि अहिल्यानगर या भागांत औद्योगिक विकासाला गती मिळणार असून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीला चालना मिळणार आहे.
उद्योग, गुंतवणूक आणि सेवा क्षेत्रांतील या प्रकल्पांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध उद्योगांच्या प्रतिनिधींशी सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.


























































