पोलिसांकडूनच ड्रग्ज माफीयांना साथ, अहिल्यानगरमधील प्रकरणाची चौकशी करून कठोर कारवाई करावी; रोहित पवार यांची मागणी

पुणे ग्रामीण पोलिसांनी १८ जानेवारी रोजी रात्री उशिरा केलेल्या मोठ्या कारवाईत शिरूर तालुक्यातील एका गॅरेज चालकाकडून तब्बल एक किलो मेफेड्रॉन (मेथॅमफेटामाइन ड्रग्ज ) जप्त केले असून, त्याची बाजारमूल्य २ कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. याच प्रकरणात इतर दोघांकडून ९ किलो मेफेड्रॉन जप्त करण्यात आले, ज्यामुळे एकूण २५ कोटी रुपयांहून अधिक किमतीचे ड्रग्ज पकडले गेले आहेत.

या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, प्रमुख आरोपीने चौकशीदरम्यान दिलेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याने त्याला हे ड्रग्ज पुरवले असल्याचा दावा केला आहे. यामुळे जप्त केलेले ड्रग्ज हे अहिल्यानगरच्या नार्कोटिक्स गोडाऊनमधूनच आले असावेत, असा संशय व्यक्त होत आहे. या प्रकरणाची दखल घेत पुणे पोलिसांनी काल (१९ जानेवारी) अहिल्यानगर जिल्ह्यातील LCB शाखेतील नार्कोटिक टेबल सांभाळणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे.

यावरच आपली प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार म्हणाले आहेत की, “पोलिसांकडूनच ड्रग्स माफीयांना साथ दिली जात असेल तर ही राज्यासाठी धोक्याची घंटा आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून पोलिसांच्या प्रतिमेला डाग लावणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.”

X वर पोस्ट करत रोहित पवार यांनी पुढे म्हटले की, अशा प्रकारे पोलीस यंत्रणेतच ड्रग्ज तस्करीला पाठिंबा मिळत असेल तर समाजातील तरुण पिढी धोक्यात येईल. त्यांनी राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनाकडे या प्रकरणाची तातडीने आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.