
>> विजय पांढरीपांडे
आजच्या जगात या नव्याने आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेला इमोशनल इंटेलिजन्सची साथ अत्यावश्यक आहे. हा एकत्र प्रवास अधिक सुखदायी ठरण्याची शक्यता आहे. यावर बरेच काम चालू आहे.अशा नव्या संकल्पना सुरुवातीला नवी आव्हाने घेऊनच सामोऱया येतात. त्यांचा स्वीकार करण्याआधी सर्वांगाने विचार करणे ही आपली नैतिक विवेकी जबाबदारी आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता स्वीकारताना स्वतःची बुद्धमत्ता गहाण ठेवणे, भावनांना तिलांजली देणे, माणुसकीचा विसर पडणे धोक्याचे ठरू शकते.आयुष्यात प्रत्येक क्षेत्रात सर्वांगीण संतुलन महत्त्वाचे असते.
सध्या सगळीकडे एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा बोलबाला आहे. या नव्या तंत्राची अफाट क्षमता, त्यांचे बरेवाईट परिणाम, त्याचा नोकऱयांवर होणारा परिणाम, त्यातून निर्माण होणारे धोके, नैतिक प्रश्न..अशा अनेक विषयांवर उलटसुलट चर्चा चाललेली आपण बघतो. मुळात ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ हा शब्दप्रयोग चुकीचा वाटतो. यात कृत्रिम असे काही नाही.कृत्रिम हात, कृत्रिम अवयव आपल्याला मूळ अवयवाचा अभाव जाणवू देत नाहीत. म्हणजे तो अगदी मूळ अवयवासारखाच असतो का? तर नाही..ते त्या अवयवाचे काम करतो. कृत्रिम पायाला संवेदना नसतात.कृत्रिम हात आपली कामे करताना मदत करेल, पण त्याला स्पर्शातले भाव कळणार नाहीत. एआयला आपण ‘न मानवी बुद्धिमत्ता’ असे म्हणू शकतो.म्हणजे जी मानवी नाही ती बुद्धिमत्ता. यात भावना, संवेदना यांना थारा नसतो.
पण माणूस कोणतेही काम फक्त बुद्धीच्या आधारावर करत नाही.आपले विचार, आपले निर्णय हे बुद्धी आणि भावना दोन्हीचा उपयोग करून संतुलित पद्धतीने घेतलेले असतात. आपल्या निर्णयात काय चांगले, काय वाईट याचाही विचार असतो. कुणाला काय वाटेल, कुणी हे कसे स्वीकारेल याचाही आपण विचार करतो निर्णय घेताना. कृत्रिम बुद्धिमत्ता भावनेला थारा देत नाही हे आपण नीट समजून घेतले पाहिजे.
औद्योगिक क्षेत्रात, आय.टी. संस्थांत, प्रॉडक्ट निर्मिती करताना, नव्या संकल्पना साकारताना केवळ उपयोगिता, आर्थिक बजेट ( किंमत), सोय, आधुनिकता एवढाच संकुचित विचार करून चालत नाही. ते काम, तो प्रोजेक्ट हाताळणारी टीम, त्यातील प्रत्येकाची भावनिक गुंतवणूक तितकीच महत्त्वाची असते. एखादी व्यक्ती कितीही बुद्धिमान असली, त्याची निर्णय क्षमता, प्रतिभा कितीही उच्च पातळीची असली तरी उद्योग, प्रोजेक्ट हे सामूहिक टीमवर्क असते. टीममधील प्रत्येक जण एक दुसऱयावर अवलंबून असतो. एकाचे काम, त्याचे निर्णय हे दुसऱयाच्या कामावर, निर्णयावर चांगला वाईट परिणाम करीत असतातच.
टीममधील प्रत्येक पायरी, पातळीवरची व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी, टीमशी कशी वागते, यांचे परस्पर को-ऑर्डिनेशन, अंडरस्टँडिंग किती चांगले ( किंवा वाईट) आहे यावर एंड रिझल्ट अवलंबून असतो. इथे बुद्धी इतकीच भावना, संवेदना महत्त्वाची ठरते. एखादी व्यक्ती कौटुंबिक कारणाने अस्वस्थ असेल; शारीरिक, मानसिक व्याधीने त्रस्त असेल तर त्यामुळे ती साखळी तुटू शकते. अशा वेळी एकमेकांना समजून घेणे, एक दुसऱयाच्या भावनिक अडचणींची जाण असणे महत्त्वाचे ठरते.
सिंपथी, एम्पथी, पेशन्स, समजूतदारपणा या टीमवर्कसाठी, उत्तम रिझल्टसाठी तितक्याच गरजेच्या आहेत, जितकी बुद्धिमत्ता गरजेची आहे.प्रतिभा गरजेची आहे. अनेक कामावरच्या व्यक्ती, आपल्या अडचणी, घरगुती समस्या मोकळेपणाने स्वतःहून सांगत नाहीत.
विशेषकरून स्त्रियांच्या बाबतीत हे घडते.( पुरुषही याला अपवाद नाहीत). अशा वेळी टीम लीडरने सजग राहणे जास्त गरजेचे असते.कुणी सारख्या चुका करत असेल किंवा कुणाकडून दिरंगाई होत असेल, टाइमलाइनवर, टार्गेटवर परिणाम होत असेल तर त्या व्यक्तीला सर्रास दोषी ठरविण्याआधी, जबाबदार धरण्याआधी भावनिक पातळीवर संवाद साधून नेमकी कारणे जाणून घ्यायला हवीत. काही अपवाद सोडले तर सहसा कुणी मुद्दाम हलगर्जीपणा करीत नाही. कामात टाळाटाळ करणार नाही. त्यामागे काहीतरी कारण असते. वैयक्तिक अडचण असू शकते.
काम, प्रोजेक्ट, टाइम लाइन, टार्गेट हेच टीम मेंबरचे सर्वेसर्वा आयुष्य नसते. त्याचेही घर, कुटुंब असते. मुलाबाळांची आजारपणे, घरात असलेल्या वृद्धांची काळजी अशा कितीतरी व्यक्तिगत समस्या असू शकतात. अशा परिस्थितीत आपण स्वतः कसे वागतो, स्वतःवर कंट्रोल कसा करतो,आतील उद्रेकाला कसे सामोरे जातो हे सगळे इमोशनल इंटेलिजन्समध्ये येते. मनावर ताबा मिळवणे, वागण्या बोलण्यात संतुलितपण असणे, आपली अडचण लपंडाव न खेळता स्पष्टपणे सांगणे, आपण लीडर असलो तर दुसऱयाची अडचण जाणून घेणे, हवी तिथे शक्य तितकी मदत करून त्या व्यक्तीला निराशेच्या वर्तुळातून बाहेर काढणे..अशा अनेक गोष्टी घरीदारी, कामाच्या ठिकाणी महत्त्वाच्या ठरतात.
आपला बायोडेटा, ग्रेड्स, आपला पगार, पॅकेज, मिळणाऱया सोयीसुविधा यांबरोबरच आपण जिथे काम करतो तिथले वार्ंकग एन्व्हायर्नमेंट पोषक वातावरण तितकेच महत्त्वाचे असते. तिथल्या माणसांचे एकमेकांशी माणुसकीच्या नात्याने वागणे, एकमेकांना समजून घेणे, एकमेकांना मदत करणे हे जास्त महत्त्वाचे असते. हा सगळा इमोशनल इंटेलिजन्सचाच भाग आहे. ऐहिक सुखे कितीही मिळाली, पायाशी लोळली तरी मानसिक समाधान नसेल, प्रत्येक जण आतून बाहेरून आनंदी नसेल तर बाकी सगळे व्यर्थ ठरते.
म्हणूनच आजच्या जगात या नव्याने आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेला इमोशनल इंटेलिजन्सची साथ अत्यावश्यक आहे. हा एकत्र प्रवास अधिक सुखदायी ठरण्याची शक्यता आहे. यावर बरेच काम चालू आहे.अशा नव्या संकल्पना सुरुवातीला नवी आव्हाने घेऊनच सामोऱया येतात. त्यांचा स्वीकार करण्याआधी सर्वांगाने विचार करणे ही आपली नैतिक विवेकी जबाबदारी आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता स्वीकारताना स्वतःची बुद्धमत्ता गहाण ठेवणे, भावनांना तिलांजली देणे, माणुसकीचा विसर पडणे धोक्याचे ठरू शकते.आयुष्यात प्रत्येक क्षेत्रात सर्वांगीण संतुलन महत्त्वाचे असते.































































