शिवसेनाप्रमुखांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सामाजिक उपक्रम

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष 23 जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्यानिमित्त शिवसेनेसह विविध सामाजिक संस्थांच्या वतीने राज्यभरात रक्तदान शिबीर, रुग्णांना फळवाटप अशा विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
खार येथे रक्तदान शिबीर

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून शिवसेना शाखा क्र. 94 च्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. हे शिबीर रविवार, 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत गुरुसिंह गुरुद्वारा सभागृह, खार पूर्व येथे होणार आहे. या शिबिराला शिवसेना सचिव आमदार वरुण सरदेसाई, विभाग संघटक रजनी मेस्त्राr, विधानसभा संघटक सदा परब, उपविभागप्रमुख दीपक भूतकर, नगरसेविका प्रज्ञा भूतकर आदी उपस्थित राहणार आहेत. रक्तदात्यांनी मोठय़ा संख्येने या शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक-शाखाप्रमुख संदीप शिवलकर यांनी केले आहे.

राजावाडी रुग्णालयात पौष्टिक आहार वाटप

शिवसेनाप्रमुखांचे जन्मशताब्दी वर्ष आणि समर्थ प्रेरणा प्रतिष्ठानच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून प्रतिष्ठानच्या वतीने पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात नवजात बालकांच्या संगोपनासाठी लागणारे साहित्य तसेच त्यांच्या मातांना पौष्टिक आहार वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास लिगाडे यांनी दिली.