बदनापूरचे भाजपा आमदार नारायण कुचे यांची एक वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये कुचे हे निवडणूकीतील पैसा वाटपाविषयी बोलत आहेत. ”पोलीस बंदोबस्तात पैसे वाटू”, असे त्यांनी समोरच्या माणसाला सांगितल्याचे या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे. ही ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून त्यानंतर कुचे यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. मात्र कुचे यांनी ही ऑडिओ क्लिप आपल्या नसल्याचे म्हटले आहे.
काय आहे त्या ऑडिओ क्लिपमध्ये –
आमदार नारायण कुचे यांना फोन करणारी व्यक्ती ही त्यांना अंधार झाल्यावर पैसे वाटा साहेब असं सांगत आहेत. त्यावर कुचे यांनी पोलीस बंदोबस्तात पैसे वाटू असं उत्तर दिलं.
त्यांची ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर कुचे यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत ही ऑडिओ क्लिप आपली नसल्याचे सांगितले आहे. ”मला आणि भाजपला बदनाम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या ऑडिओ क्लिपला बिन बुडाचे आरोप मानतो. याआधी देखील अशा क्लिप व्हायरल झाल्यावर दोन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्या आहेत. या ऑडिओ क्लिप संदर्भात देखील तक्रार दाखल करून अब्रू नुकसानीचा दावा देखील करणार आहे”, असे कुचे यांनी सांगितले.



























































