बदलापूर पुन्हा हादरले; चार वर्षांच्या चिमुकलीचे स्कूल व्हॅनचालकाकडून लैंगिक शोषण

दोन वर्षांपूर्वी एका नामांकित शाळेमध्ये विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली असतानाच आज बदलापूर शहर पुन्हा एकदा हादरले आहे. शाळेतून घरी जाणाऱ्या चिमुकलीचे स्कूल व्हॅनचालकानेच लैंगिक शोषण केले असून विरोध केला म्हणून तिला मारहाणही करण्यात आली. ही घटना घडल्याचे समजताच संतप्त जमावाने व्हॅनवर दगडफेक करून काचा फोडल्या. दरम्यान स्कूल व्हॅनचालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

बदलापूर पश्चिम भागात राहणारी चार वर्षांची चिमुकली नेहमीप्रमाणे आज सकाळी शाळेत गेली होती. ती साधारण दुपारी साडेबाराच्या सुमारास घरी परतणे अपेक्षित होते, मात्र ती दोन तास उशिरा आली. दरम्यान तिच्या आईने स्कूल व्हॅनचालकाला वारंवार फोन लावला, पण त्याने हा फोन उचलला नाही. दुपारी अडीचच्या सुमारास घरी पोहोचलेली मुलगी अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत होती. तिने आपल्या आईला चालकाने नको त्या ठिकाणी स्पर्श केल्याचे सांगितले.  हा प्रकार घडल्यानंतर पीडित चिमुकलीच्या आई आणि वडिलांनी थेट पोलीस स्टेशन गाठले. लैंगिक अत्याचार करणाऱया विकृत चालकाला पोलिसांनी लगेच ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू केली आहे. ही व्हॅनदेखील पोलीस ठाण्यात आणली. आजच्या घटनेतील स्कूल व्हॅनमध्ये महिला मदतनीस नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.