
अखंड हिंदुस्थानचे लाडके नेते, हिंदुत्वाचा धगधगता अंगार, मराठी मनाचे मानबिंदू हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष 23 जानेवारीपासून सुरू होत असून माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात भव्य सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळय़ाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
‘शिवसेना’ नावाचा चार अक्षरी मंत्र देऊन कोटय़वधी मनात मराठी अस्मितेचा आणि ज्वलंत हिंदुत्वाचा अंगार फुलवणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष तमाम शिवसैनिक आणि मराठीजनांसाठी उत्सवी वर्ष आहे. या जन्मशताब्दी वर्षात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून आज होणारा षण्मुखानंद सभागृहातील सोहळा सर्वांसाठीच खास ठरणार आहे.
- उद्धव ठाकरे – राज ठाकरे या सोहळय़ाला मार्गदर्शन करणार असून सोहळय़ाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित राहणार असून शिवसेनेचे नेते, पदाधिकारी तसेच मनसेचे पदाधिकारीही मोठय़ा संख्येने सोहळय़ात सहभागी होतील.
- महापालिका निवडणुकीचे निकाल नुकतेच लागले. या निकालानंतर होणाऱया या सोहळ्याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
स्मृतिस्थळावर निष्ठा आणि श्रद्धेची वारी
शिवसेनाप्रमुख हे शिवसैनिकांचे दैवतच. त्यांच्या जन्मदिनी शिवतीर्थावर स्मृतिस्थळी नतमस्तक होण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातून शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमी येतात. आजही निष्ठा आणि श्रद्धेची वारी शिवतीर्थावर अनुभवता येणार आहे. त्यासाठी पालिकेकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
स्थळ – षण्मुखानंद सभागृह, माटुंगा
वेळ – सायं. 6 वाजता

























































