
इंडिगोच्या दिल्ली-पुणे विमानाला पुन्हा बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली. इंडिगोच्या विमानाला धमकीची गेल्या पाच दिवसांतील ही दुसरी घटना आहे. विमानातील शौचालयात हस्तलिखित चिट्ठी लिहून विमान बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली. पुणे विमानतळावर विमानाचे सुरक्षित लँडिंग करत सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, नियोजित वेळेनुसार गुरुवारी रात्री 8.40 वाजता विमान पुणे विमानतळावर उतरणे अपेक्षित होते. मात्र विमान रात्री 9 वाजून 24 मिनिटांनी विमानतळावर उतरले. त्यानंतर रात्री 9 वाजून 27 मिनिटांनी ते बे क्रमांक 3 वर पार्क करण्यात आले. त्यानंतर, एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) ने बॉम्बच्या धमकीची माहिती अॅप्रन कंट्रोलला दिली.
अॅप्रन क्रूने तात्काळ सर्व संबंधित एजन्सींना सतर्क केले. त्यानंतर बॉम्ब धमकी मूल्यांकन समिती (BTAC) ची बैठक बोलावली आणि विमानाला आयसोलेशन बेमध्ये हलवण्यात आले. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने (BDDS) विमानाची कसून तपासणी केली. मात्र तपासणीत काहीही संशयास्पद आढळले नाही. त्यानंतर विमानाला सामान्य ऑपरेशनसाठी परवानगी देण्यात आली आहे.

























































