
चंद्रपूरमध्ये महापौरपद दृष्टिपथात असतानाही काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळून आल्याने युद्धात जिंकले पण तहात हरले, अशी स्थिती नेत्यांच्या वागण्यामुळे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चंद्रपूर महापालिकेत जनतेने कुणा एका पक्षाला बहुमत दिले नसले, तरी काँग्रेसला बहुमताजवळ नेऊन ठेवले आहे. 66 सदस्य असलेल्या या महापलिकेत काँग्रेसला 30 जागा मिळाल्या. सध्या बहुमतासाठी आता केवळ चार मतांची गरज आहे, ती सहजपणे मिळू शकतात, अशी स्थिती आहे. मात्र महापौर कुणाचा, स्थायी समिती अध्यक्ष कुणाचा आणि गटनेता कुणाचा यावरून खासदार प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांच्यात वाद सुरू आहे. हे दोन्ही नेते एकत्र यायला आणि सामंजस्याने तोडगा काढायला तयार नाहीत. त्यामुळे हातातील आयती संधी जाते की काय, अशी स्थिती इथे निर्माण झाली आहे.
या दोन्ही नेत्यांमध्ये संवाद आणि समन्वय नसल्याने असंतोषाची दरी वाढतच चालली आहे. यामुळेच शुक्रवारी खासदार धानोरकर यांनी आपल्या 13 समर्थक नगरसेवकांना घेऊन आयुक्तालय गाठले आणि काँग्रेसचा गट स्थापन केला. या घटनेमुळे काँग्रेसमध्ये भूकंप आला. या भूकंपाचे हादरे राज्य आणि दिल्लीपर्यंत बसले. हातात बहुमत असतानाही केवळ नेत्यांच्या भांडणामुळे पक्षाची बदनामी होत असल्याचे लक्षात आल्याने दिल्लीवरून सूत्रे हलायला लागली आहेत. राज्याचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी आता दोन्ही नेत्यांशी संपर्क साधून यावर तोडगा काढण्याचे निर्देश दिले. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी वाद संपल्याचे जाहीर केले आहे. मात्र, जोपर्यंत काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांचा एकत्र गट होत नाही आणि पदांची विभागणी होत नाही, तोवर हा वाद शमला, असे म्हणता येणार नाही. तसेच आठवडाभरापासून घराबाहेर असलेले नगरसेवकही नेत्यांमधील भांडणाने वैतागले आहेत. कधी एकदाचा सोक्षमोक्ष लागतो आणि कधी घरी जातो, या विवंचनेत हे नगरसेवक आहेत.




























































