
म्हटलं तर सुफल संपूर्ण किंवा म्हटलं तर असफल अपूर्ण अशी कॉन्कॉर्डची कहाणी. तुम्ही म्हणाल काय आहे हे कॉन्कॉर्ड? आणि तसं वाटणंही साहजिक. कारण 2003 मध्ये कॉन्कॉर्ड विमानसेवा बंद होऊन आता तेवीस वर्षे होतायत. 21 जानेवारी 1976 या दिवशी कॉन्कॉर्ड नावाच्या बहुचर्चित विमानाचं पहिलं उड्डाण झालं त्याला आता 50 वर्षे होतील. पक्ष्याच्या बाकदार चोचीसारखा पुढचा भाग असलेलं कॉन्कॉर्ड धावपट्टीवरून रॉकेटसारखं उभं पण ‘धावत’ जाऊनच आकाशात झेपावायचं. फ्रान्स आणि इंग्लंड या दोन देशांच्या सहयोगाने हे अद्भुत विमान बनवण्यात आलं होतं. फ्रान्सचं कॉन्कॉर्ड – 001 आणि इंग्लंडचं कॉन्कॉर्ड 002 अशी नावंही ठरली.
या विमानाचं विस्मयकारी वैशिष्ट्य असं होतं की, ती ध्वनिवेगाच्या दुपटीच्या वेगाने प्रवास करत. ध्वनी किंवा आवाज प्रति सेकंदाला 340 मीटर या वेगाने प्रवास करतो. हा त्याचा हवेतला वेग. पाण्यात तो 1480 मीटर प्रतिसेकंद आणि स्टीटसारख्या धातूमधून 5960 मीटर प्रतिसेकंद वेगाने जातो. म्हणजे तो 3 सेकंदांत 1 किलोमीटर अंतर कापतो. आता विमान उडणार ते हवेतूनच. या विमानांचा वेग ताशी 2160 किलोमीटर म्हणजे ध्वनिवेगाच्या दुप्पट होता. विमान आकाशात 60 हजार फुटांवरून उडायचं. सुरुवातीला 2160 किलोमीटरचा वेग नंतर वाढून 2179 किलोमीटरवर जायचा. त्यामुळे हे विमान जगातलं सर्वात वेगवान प्रवासी हवाई वाहन होतं.
‘कॉन्कॉर्ड’चा अर्थ होता सहयोग. लॅटिन भाषेत कॉर म्हणजे हृदय आणि कॉन म्हणजे एकत्र. फ्रान्स-इंग्लंड यांचं हार्दिक सहकार्य म्हणून कॉन्कॉर्ड. अशा प्रकारचं सुपर सॉनिक विमान आता कुठेही नाही. कॉन्कॉर्ड जेव्हा येऊ घातलं होतं त्याच्या पाच वर्षे आधीच म्हणजे 1971 मध्ये मुंबईतल्या आमच्या कॉलेजात, इंग्लिशच्या पुस्तकात या आगामी आश्चर्यावर एक धडा (पाठ) होता. त्यामुळे आम्हा नवतरुणांमध्ये कॉन्कॉर्ड कधी उडतंय आणि ते मुंबईत येणार आहे का, याविषयी विलक्षण उत्सुकता होती.
1954 मध्येच एका कराराने फ्रान्स आणि इंग्लंड यांनी असं सुपरसॉनिक (स्वनातीत) वेगाचं विमान बनवण्याचं ठरवलं. फेब्रुवारी 1969 मध्ये फ्रॉन्समधील टाऊलासी येथून पाहिलं कॉन्कॉर्ड उडालं. प्रयोग यशस्वी झाला तर अशी 350 विमाने बनवण्याचा मानस होता. 92 ते 128 प्रवाशांना नेऊ शकेल एवढंच हे विमान होतं. पण पन्नास वर्षांपूर्वी तशी कल्पनाही धाडसाचीच होती. रोल्स रॉइस आणि ऑलिम्पस टर्बोजेटवर उडणार होतं. मात्र पहिल्या प्रवासी उड्डाणाला अपेक्षेपेक्षा उशीर झाल्याने उत्पादन खर्च वाढत चालला होता. अखेर 21 जानेवारी 1976 या दिवशी पॅरिस आणि लंडन येथून दोन कॉन्कॉर्ड अमेरिकेकडे उडाली. एकाच झेपेत अॅटलॅन्टिक महासागर पार करून अमेरिकेत पोचली. पॅरिस आणि लंडनपासून न्यूयॉर्कपर्यंतचं 5585 कि.मी. अंतर अवघ्या तीन तासांत पार करण्याचा पराक्रम या विमानांनी केला. म्हणजे सकाळ लंडन किंवा पॅरिसहून कामापुरतं अमेरिकेला जायचं आणि संध्याकाळी घरी परतायचं अशी सोय या देशांमधल्या धनाढ्य उद्योगपतींसाठी आणि कॉर्पोरेट क्षेत्रात मोठ्या पदावर असलेल्यांसाठी झाली.
कॉन्कॉर्ड विमानं अमेरिकेत वॉशिंग्टन तसेच बार्बाडोस, मेक्सिको सिटी आणि सिंगापूरपर्यंत उडत असत. त्यांना पॅरिस-लंडन ते सिंगापूर प्रवासाला 18 ऐवजी नऊ तास लागायचे. पौर्वात्य देशांपैकी बहुतेक सिंगापूर, हाँगकाँग, टोकियो फ्लाइट्स नित्याच्या असाव्या. कॉन्कॉर्डच्या 27 वर्षांच्या हवाई सेवेत 25 लाखांपेक्षा जास्त प्रवाशांनी सुपरसॉनिक प्रवासाचा लाभ घेतला. मात्र 8 तासांचा प्रवास तीन तासांत करण्यासाठी एकेरी भाडं 5000 डॉलर होतं.
कॉन्कॉर्ड केवळ मर्यादित हवाई मार्गावरूनच का उडायचं याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्याच्या सुपरसॉनिक वेगामुळे निर्माण होणारा ‘सॉनिक बूम.’ त्यामुळे देशोदेशींच्या ध्वनी कायद्याचं उल्लंघन होऊ शकेल म्हणून परवानगी असणाऱ्या ठिकाणीच उड्डाणं व्हायची. प्रचंड आवाजाने विमानतळाजवळच्या घरांच्या खिडक्यांच्या काचा तडकण्याचा आणि कानठळ्या बसण्याचाही धोका होताच. त्यामुळे सर्वसामान्यांच्या अशा संभाव्य तक्रारी टाळण्यासाठी त्यांचं उड्डाण ठरावीक मार्गावरच होत असे.
पाव-शतकभर या विमानाने आकाश ‘गाजवत’ प्रवास केला. अनेक प्रवाशांचा वेळ वाचवला. कॉन्कॉर्डचा प्रवास ही प्रतिष्ठेची गोष्ट ठरली. परंतु 25 जुलै 2000 रोजी पॅरिसच्या विमानतळावरून स्टाफ आणि प्रवासी मिळून 109 जणांसह उड्डाण केल्याकेल्याच कॉन्कॉर्ड कोसळलं. आतील सर्वजण आणि विमानतळावरचे चार लोक मरण पावले. कॉन्कॉर्डच्या इतिहासातला हा एकमेव अपघात. पण त्याने या सुपरसॉनिक सेवेचं कंबरडं मोडलं. प्रवासी सेवा 2001 पर्यंत स्थगित करण्यात आली आणि अखेर 2003 मध्ये ती पूर्णपणे थांबली. 20 पैकी 18 कॉन्कॉर्ड विमानं आता युरोप-अमेरिकेत ‘दर्शना’साठी ठेवण्यात आली आहेत.
कॉन्कॉर्डचा एकमेव प्रतिस्पर्धी म्हणजे रशियाचं ट्युपोलेव-144 हे सुपरसॉनिक कमर्शिअल विमान 1975 ते 1983 पर्यंत कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात केवळ 103 उड्डाणं झाली होती. कॉन्कॉर्ड मात्र आमची उत्सुकता वाढवणारं होतं. ते 1972 च्या जूनमध्ये पाहायला मिळालं कारण त्याची ‘प्रात्यक्षिक उड्डाणं’ त्यावेळी जगभर सुरू होती. मुंबई विमानतळावर ते बहारिनहून अवघ्या 80 मिनिटांत आलं होतं. त्यावेळच्या सांताक्रूझ म्हणजे आताच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवरची विमान उड्डाणाची हवाई जागा (फनेल) आमच्या घरावरूनच जात असल्याने कॉन्कॉर्ड पाहता आलं!




























































