
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा शुभारंभाचा सोहळा 23 जानेवारी रोजी माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात झाला. या कार्यक्रमात शिवसेनाप्रमुखांनी शिवसैनिकांसाठी लिहिलेल्या एका प्रतीकात्मक पत्राचे वाचन परेश दाभोळकर यांनी केले. ‘कपाळावरचं निष्ठेचं कुंकू पुसू देऊ नका,’ असा संदेश बाळासाहेबांनी या पत्रातून दिला. जणू बाळासाहेबच आपल्याशी संवाद साधत आहेत असा भास या पत्रामुळे शिवसैनिकांना झाला आणि सारेच भावुक झाले. या पत्रवाचनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
परेश दाभोळकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी जन्मशताब्दी सोहळ्यात ‘बाळासाहेब-एक हिंदुत्वाचा झंझावात’ हा संगीतमय कार्यक्रमही सादर केला. यावेळी त्यांनी बाळासाहेबांचे ते पत्र वाचून दाखवले. ‘आज तुमचा शिवसेनाप्रमुख 100 वर्षांचा झाला’, अशी सुरुवात असलेल्या या पत्रातून बाळासाहेबांनी प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा दिला. शिवसैनिकांच्या संघर्षाचे कौतुक केले. शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केले अशी विचारणा करणाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. मुंबईतील मराठी माणसाचे अस्तित्व टिकवण्यात शिवसेनेचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी ठणकावले. राजकारणातील सध्याच्या फोडाफोडीवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
मशालीशी प्रामाणिक रहा
‘शिवसेना हा महाराष्ट्राच्या माथ्यावरचा मळवट आहे. त्याचे रक्षण करणे हे तुमचे काम आहे. त्यासाठी तुमच्या कपाळावर असलेले निष्ठेचे कुंकू कधी पुसू देऊ नका. मुंबईचा घास घेणाऱ्या भस्मासुराला अडवण्यासाठी सैनिक म्हणून पुढे राहा. मशाल हेच आता आपले निवडणूक चिन्ह असून त्याच्याशी प्रामाणिक राहा. सामान्य माणसाशी, शिवसेनेशी प्रामाणिक रहा. माझे आशीर्वाद आहेत,’ असा संदेश बाळासाहेबांनी या पत्रातून दिला.































































