शिवसेनेचे नगरसेवक हरवले; कल्याणमध्ये झळकले पोस्टर्स

Four Newly Elected Shiv Sena Corporators Missing in Kalyan; 'Missing' Posters Surface

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर मशाल चिन्हावर निवडून आलेले शिवसेनेचे चार नगरसेवक बेपत्ता झाले. आठवडा उलटला तरी त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरत नगरसेवक हरवले असल्याचे पोस्टर्स कल्याण पूर्वेत झळकावले आहेत. कुणाला माहिती मिळाल्यास तत्काळ शिवसेना शहर शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान उद्या कल्याण पश्चिम येथील शहर शाखेत निवडून आलेल्या शिवसेनेच्या सर्व 11 नगरसेवकांची तातडीची बैठक आयोजित केली आहे. बैठकीला गैरहजर राहिल्यास त्यांचे पद रद्द केले जाणार असून गटनेते उमेश बोरगावकर यांनी तसा व्हीपही जारी केला आहे.

कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेचे एकूण 11 नगरसेवक निवडून आले. त्यापैकी मधुर म्हात्रे, अॅड. कीर्ती ढोणे, राहुल कोट, स्वप्नाली केणे हे चार नगरसेवक बेपत्ता झाले. शिवसेनेच्या गटनेत्यांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण संपर्क होऊ शकला नाही. अखेर कल्याण पूर्व शहरप्रमुख शरद पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात जाऊन नवनिर्वाचित नगरसेवक मधुर म्हात्रे व कीर्ती ढोणे हे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे.

स्वतःहून गेले की अज्ञात स्थळी नेले?

बेपत्ता असलेले चार नगरसेवक स्वतःहून गेले की त्यांना कोणी अज्ञात स्थळी नेले याचा शोध पोलिसांनी घ्यावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. विशेष म्हणजे, ‘त्या’ नगरसेवकांचे कुटुंबदेखील चिंतेत आहे.