देश विदेश – 23 एप्रिलला उघडणार बद्रीनाथ धामचे कपाट

उत्तराखंडमधील प्रसिद्ध बद्रीनाथ धामचे दरवाजे या वर्षी 23 एप्रिल 2026 ला उघडणार असल्याचे निश्चित झाले आहे, तर उत्तरकाशी येथील गंगोत्री धाम आणि यमुनोत्री धामचे दरवाजे दोन दिवस आधीच म्हणजेच 19 एप्रिल रोजी विधीपूर्वक भक्तांसाठी उघडले जातील. वसंत पंचमीच्या मुहूर्तावर नरेंद्र नगर राजवाडय़ात विधीपूर्वक बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडण्याच्या तारखेची अधिकृत घोषणा करण्यात आली. बद्रीनाथ धामचे दरवाजे आता अवघ्या तीन महिन्यांनंतर भाविकांसाठी खुले होणार आहेत.

जर्मनीने सैन्यावरील खर्च वाढवला

दुसरे महायुद्ध झाल्यानंतर जर्मनीने दीर्घकाळ लष्करी सामर्थ्यापासून दूर राहणे पसंत केले होते, परंतु आता यात बदल केला असून जर्मनीने सैन्यावरचा खर्च वाढवायला सुरुवात केली. जास्तीत जास्त तरुण लष्करात भरती व्हावे यासाठी आणि तरुणांना सैन्यात आणण्यासाठी त्यांना तब्बल अडीच लाख रुपयांपर्यंतची ऑफर देऊ केली आहे. रशियाचा धोका आणि ट्रम्प यांच्या काळात अमेरिकेवरील तुटलेला विश्वास यामुळे जर्मनीने सुरक्षेची जबाबदारी स्वतःच उचलण्याचे ठरवले आहे.

‘बॉर्डर 2’चा धमाका; चार दिवसांत 160 कोटींच्या पार

सनी देओल आणि वरुण धवन यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘बॉर्डर 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त घोडदौड सुरू ठेवली आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या चार दिवसांतच या सिनेमाने 160 कोटी रुपयांचा टप्पा आरामात ओलांडला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर प्रेक्षकांनी सिनेमागृहात मोठी गर्दी केल्याने चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ झाली आहे. सॅकनिल्क डॉट कॉमच्या आकडेवारीनुसार, सोमवारी सायंकाळपर्यंत चित्रपटाने 167.48 कोटींचे कलेक्शन केले.