
जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग अॅप ‘व्हॉट्सअॅप’ आता आपल्या युजर्ससाठी लवकरचएक मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. आतापर्यंत पूर्णपणे मोफत सेवा देणारे व्हॉट्सअॅप लवकरच ‘सबस्क्रिप्शन मॉडेल’ आणण्याची शक्यता आहे. म्हणजेच, व्हॉट्सअॅपच्या काही वैशिष्टय़ांचा वापर करण्यासाठी युजर्सना पैसे मोजावे लागू शकतात.
मिळालेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवणे पूर्वीप्रमाणेच मोफत राहील, मात्र हा बदल प्रामुख्याने ‘स्टेटस’ या फीचरसाठी असेल. व्हॉट्सअॅपच्या नव्या 2.26.3.9 या बीटा व्हर्जनच्या कोडमध्ये असे संकेत मिळाले आहेत की, पंपनी स्टेटस टॅबमध्ये जाहिराती दाखवण्यास सुरुवात करणार आहे. या जाहिरातींपासून सुटका हवी असल्यास युजर्सना ‘पेड सबस्क्रिप्शन’ घ्यावे लागेल. जे युजर्स पैसे भरणार नाहीत, त्यांना इतरांचे स्टेटस पाहताना मध्ये जाहिराती दिसतील. ज्याप्रमाणे यूटय़ूब किंवा स्पॉटिफायवर जाहिराती टाळण्यासाठी प्रीमियम सबस्क्रिप्शन घ्यावे लागते, तसाच काहीसा हा प्रकार असेल.
व्हॉट्सअॅपने अद्याप याबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही. सध्या हे फीचर चाचणीच्या टप्प्यात आहे. व्हॉट्सअॅप बिझनेस वापरकर्ते सध्या त्यांच्या उत्पादनांच्या जाहिराती फेसबुक आणि इंस्टाग्रामवर दाखवू शकतात, पण भविष्यात या जाहिराती थेट व्हॉट्सअॅप स्टेटसवरही दिसण्याची शक्यता आहे.
पैसे दिले नाहीत तर काय होणार?
जर युजरने सबस्क्रिप्शन घेतले नाही, तर त्यांना व्हॉट्सअॅपच्या स्टेटस आणि चॅनेल्समध्ये वारंवार जाहिराती पाहाव्या लागू शकतात. मात्र जे युजर्स पैसे देऊन सबस्क्रिप्शन घेतील, त्यांना जाहिरातमुक्त व्हॉट्सअॅप वापरता येईल. महत्त्वाचे म्हणजे, सध्या हे सबस्क्रिप्शन फक्त स्टेटस आणि चॅनेल्समध्ये दिसणाऱया जाहिरातींसाठीच असण्याची शक्यता आहे. म्हणजेच,
चॅट्स किंवा कॉलिंगसारख्या इतर फीचर्समध्ये जाहिराती येण्याची शक्यता कमी आहे.






























































