नेरळच्या गोट फार्मला आग; 350 बकऱ्यांचा होरपळून मृत्यू

नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील माणगाव मधील एका गोट फार्मला भीषण आग लागली. ही आग इतकी भीषण होती की यात तब्बल ३५० बकऱ्या आणि कबुतरांचा होरपळून मृत्यू झाला. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीत सुमारे दीड कोटीचे नुकसान झाल्याचे फार्म मालकाने सांगितले.

वरेडी येथे सय्यद तारीफ यांच्या मालकीचा राबिया गोट फार्म आहे. या ठिकाणी दोन मजली इमारतीत बकऱ्यांसाठी निवारा शेड उभारण्यात आली आहे. यामध्ये विविध जातीच्या बकऱ्यांचे संगोपन आणि विक्री केली जाते. या शेडमध्ये मोठ्या प्रमाणात खाद्यसाठा आणि इतर साहित्य ठेवण्यात आले होते. रविवारी मध्यरात्री एकच्या सुमारास शेडच्या दुसऱ्या मजल्यावरील इलेक्ट्रिक बोर्डमध्ये अचानक शॉर्टसर्किट होऊन स्पार्क झाला आणि क्षणार्धात आगीचा भडका उडाला. लाकडी साहित्य, चारा यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. आगीची तीव्रता इतकी होती की यात बकऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला, तर शेड परिसरात असलेली काही कबुतरेही मृत्युमुखी पडली.

आगीची माहिती मिळताच फार्म मालक, कामगारवर्ग तसेच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राण्यांचे प्राण वाचवण्यासाठी जीव धोक्यात घालून मदतकार्य केले. मात्र बकऱ्यांभोवती लोखंडी जाळी असल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी पंचनामा केला.

पोलिसांनी जप्त केलेल्या गाड्यांना आग

कल्याण – पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांपैकी एका वाहनाला अचानक आग लागल्याची घटना पोलीस लाईनच्या आवारात घडली. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि आजूबाजूच्या वाहनांनीही पेट घेतला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. याआधीदेखील दोन वेळा या ठिकाणी आग लागली होती.