अजित पवार यांचा मृत्यू ‘अकाली’; सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत चौकशी व्हावी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची मागणी

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात झालेले निधन ही अत्यंत दु:खद आणि धक्कादायक घटना असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली आहे. अजित पवार यांचा मृत्यू हा अकाली असून, कार्यक्षम आणि काम करणाऱ्या नेत्याचा अशा प्रकारे अंत होणे हे सर्वांसाठी आघातकारक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या घटनेमुळे पवार कुटुंबीयांवर मोठे दु:ख कोसळले असून त्यांच्या वेदनेत आपणही सहभागी आहोत, अशी भावना खरगे यांनी व्यक्त केली. “कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याची ताकद मिळो, हीच आम्ही प्रार्थना करू शकतो,” असेही त्यांनी सांगितले.

या विमान अपघाताची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी, अशी मागणी खरगे यांनी केली. “हा अपघात आहे. त्यामुळे याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

विमान सुरक्षेबाबत सर्वांनाच चिंता असल्याचे सांगत, मोठे राजकीय नेते, तातडीच्या कामासाठी प्रवास करणारे लोक तसेच उद्योगक्षेत्रातील व्यक्ती मोठ्या प्रमाणात हवाई प्रवास करतात, असे खरगे यांनी नमूद केले. याआधी मोठ्या विमानांचेही अपघात झाले आहेत. अहमदाबाद येथे घडलेली मोठी दुर्घटनाही सर्वांच्या स्मरणात आहे. अशा परिस्थितीत येथे लहान विमानाचा अपघात नेमका का झाला, याची चौकशी होणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.