
बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. उतरताना वैमानिकांना धावपट्टी दिसण्यात अडचण येत असल्याचे Directorate General of Civil Aviation (नागरी विमान वाहतूक महासंचालनालय) यांनी स्पष्ट केले आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.
महासंचालनालयाच्या माहितीनुसार, पहिल्यांदा उतरण्याच्या प्रयत्नात धावपट्टी न दिसल्याने वैमानिकांनी पुन्हा वर जाण्याचा (गो-अराउंड) निर्णय घेतला आणि दुसऱ्यांदा उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रक्रियेत वैमानिकांकडून आपत्कालीन इशारा (मेडे कॉल) देण्यात आलेला नाही, असेही महासंचालनालयाने स्पष्ट केले.
दिल्लीस्थित VSR Ventures Pvt. Ltd. या कंपनीचे Learjet 45 प्रकारचे विमान बारामती विमानतळावर उतरताना अपघातग्रस्त झाले. या दुर्घटनेत वैमानिकांसह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समावेश आहे.
नोंदणी क्रमांक VT-SSK असलेले हे विमान मुंबई–बारामती या मार्गावर उड्डाण करत होते. सकाळी सुमारे 08:44 वाजता हा अपघात घडला. विमानात दोन वैमानिक आणि तीन प्रवासी होते.
बारामती हा अनियंत्रित विमानतळ असून येथे हवाई वाहतुकीविषयक माहिती उड्डाण प्रशिक्षण संस्थांकडून दिली जाते. भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून येथे हवाई वाहतूक सेवा दिली जात नाही.
अपघाताच्या दिवशी विमानाने सकाळी 8 वाजून 18 मिनिटांनी बारामतीशी पहिला संपर्क साधला. त्यानंतर पुणे अॅप्रोचकडून परवानगी मिळाल्यानंतर विमानाने बारामतीपासून 30 नॉटिकल मैलांवर असल्याची माहिती दिली. वैमानिकांच्या निर्णयानुसार दृश्याधारित हवामान परिस्थितीत उतरण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्या वेळी दृश्यमानता सुमारे 3000 मीटर असून वारे शांत असल्याचे कळवण्यात आले.
पहिल्या प्रयत्नात धावपट्टी क्रमांक 11 दिसत नसल्याचे कळवल्यानंतर विमान पुन्हा वर गेले. दुसऱ्या प्रयत्नातही आधी धावपट्टी दिसत नसल्याचे सांगण्यात आले; मात्र नंतर धावपट्टी दिसत असल्याची माहिती देण्यात आली. सकाळी 8:43 वाजता विमानाला उतरण्याची परवानगी देण्यात आली; परंतु या परवानगीची वैमानिकांकडून पुन्हा पुष्टी (रीडबॅक) मिळाली नाही. त्यानंतर काही क्षणांतच धावपट्टीच्या सुरुवातीच्या भागाजवळ आगीच्या ज्वाळा दिसल्याचे निदर्शनास आले. विमानाचे अवशेष धावपट्टी क्रमांक 11 च्या डाव्या बाजूला, सुरुवातीच्या भागाजवळ आढळून आले, असे महासंचालनालयाच्या निवेदनात नमूद आहे.
VSR Ventures ही नॉन-शेड्युल्ड ऑपरेटर कंपनी असून तिच्याकडे एकूण 17 विमाने आहेत. त्यामध्ये 7 Learjet 45 विमाने समाविष्ट आहेत. कंपनीचे शेवटचे नियामक तपासणी (ऑडिट) फेब्रुवारी 2025 मध्ये झाले होते आणि त्यात कोणताही गंभीर दोष आढळला नव्हता.
या प्रकरणाची चौकशी आता Aircraft Accident Investigation Bureau (विमान अपघात तपास ब्युरो) कडे सोपवण्यात आली आहे. ब्युरोचे महासंचालक स्वतः अपघातस्थळी तपासासाठी जात आहेत.
महाराष्ट्रात गेल्या अडीच वर्षांत VSR Ventures शी संबंधित हा दुसरा अपघात आहे. यापूर्वी 14 सप्टेंबर 2023 रोजी मुंबई येथे कंपनीच्या Learjet 45XR (VT-DBL) विमानाला उतरताना अपघात झाला होता. त्या वेळी विशाखापट्टणम–मुंबई या मार्गावर सहा प्रवासी होते; मात्र त्या घटनेत जीवितहानी झाली नव्हती.



























































