
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. याआधी अनेक बडय़ा नेत्यांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांचा 23 जून 1980 रोजी विमान अपघातात मृत्यू झाला. सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी एरोबॅटिक मॅन्युव्हर करत असताना या विमानाचे नियंत्रण सुटल्याने नवी दिल्लीच्या डिप्लोमॅटिक एन्क्लेव्हमध्ये अपघात झाला. सफदरजंग विमानतळावर ते स्वतः खासगी विमान चालवत असताना हा अपघात झाला. या विमानात त्यांच्या सोबत सहवैमानिक कॅप्टन सुभाष सक्सेना यांचाही या अपघातात मृत्यू झाला. काँग्रेसचे बडे नेते माधवराव शिंदे यांचा 30 सप्टेंबर 2001 रोजी उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे एका खासगी विमान अपघातात मृत्यू झाला. कानपूरला एका सभेला संबोधित करण्यासाठी जात असताना हा अपघात झाला. त्यांच्यासोबत आणखी सहा जण होते. आग्र्यापासून 85 किमी अंतरावर हे विमान कोसळले. त्यात बसलेल्या सर्व लोकांचा यात मृत्यू झाला. आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री वाय. एस. आर. राजशेखर रेड्डी हे 2 सप्टेंबर 2009 रोजी सकाळी 8 वाजून 38 मिनिटांनी हेलिकाॅप्टरने बेगमपेटहून निघाले होते. त्यांना चित्तूर जिह्यातील एका कार्यक्रमात सहभागी व्हायचे होते. विमान अपघातात मृत्यू झाला. तर गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा 12 जून 2025 रोजी विमान अपघातात मृत्यू झाला.






























































