अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्रातलं राजकारण बदलू शकतं, संजय राऊत यांचं मोठं विधान

महाराष्ट्राचा तडफदार नेता आणि जनसामान्यांचा ‘कामाचा माणूस’ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. अजित पवारांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्रातून शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी आज बारामतीत जनसागर लोटला होता. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. मात्र, दादांच्या जाण्याने महाराष्ट्रातलं राजकारण बदलू शकतं, असं मोठं विधान संजय राऊत यांनी केलं.

संजय राऊत यांनी गुरूवारी प्रसार माध्यमांशी बोलताना अजित पवारांच्या कारकीर्दीवर भाष्य केलं. ते म्हणाले की, दादांच्या जाण्याने महाराष्ट्रातलं राजकारण बदलू शकतं. दादा या महाराष्ट्राच्या राजकारणाचा प्रमुख स्तंभ होते. त्या स्तंभावर अनेकांचं राजकीय आयुष्य उभं होतं. दादा वन मॅन आर्मी होते. आता त्या आर्मी समोर एक प्रश्नचिन्ह नक्कीच निर्माण झालं असेल. आता पुढे काय? काल त्यांच्या सहकाऱ्यांच्या डोळ्यात जे अश्रू होते. त्यांच्या समोर तोच प्रश्न होता. पण या सगळ्या गोष्टींना खूप वेळ जावा लागेल. संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. महाराष्ट्र धक्क्यात आहे, अजित दादांचं असं अचानक जाण हा धक्का महाराष्ट्र अद्याप पचवू शकलेला नाही. पुढचे अनेक दिवस महाराष्ट्राला यातून सावरता येणार नाही, असे ते यावेळी म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, अजित दादांना त्यांच्या कुटुंबाचा खास करून शरद पवारांचा राजकीय वारसा लाभला. आणि याचा फायदा त्यांना नक्कीच झाला. अजित दादांचं नेतृत्व हे पहिल्यापासून संघर्षातून निर्माण झालेलं नाही. पण त्यांना कुटुंबाकडून जी संधी मिळाली ती संधी त्यांनी योग्यप्रकारे वापरली. आपलं नेतृत्व त्यांनी निर्माण केलं. सतत लोकांमध्ये पोहोचण्याचा ते प्रयत्न करत होते, लोकांचे प्रश्न सोडवत होते. त्यांना दिलेल्या प्रत्येक निवेदनावर कारवाई होत होती. मग तो सामान्य माणूस असेल किंवा लोकप्रतिनिधी असेल, हा माझा अनुभव आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

अशा नेत्याचं अकाली जाणं, काल चित्र पाहिलं असेलच ज्या पद्धतीने आक्रोश अश्रू लोकं गाळत होते. हे भाग्य फार कमी नेत्यांना मिळत. हे पैशाने विकत मिळत नाही. हे तुम्ही जेव्हा राज्यासाठी, समाजासाठी, लोकांसाठी केलेल असतं त्यातून हे हुंदके आणि आश्रू काल महाराष्ट्राने पाहिले. विलासराव देशमुखांनंतर रुबाबदार आणि उमदा, लोकप्रिय नेता महाराष्ट्राने गमावला, अशा शब्दात त्यांनी शोक व्यक्त केला.

पुढे ते म्हणाले की, विमानाबाबत प्रत्येकाच्या मनात शंका आहे. अजित दादांनी प्रथमच विमान प्रवास केला नाही. किंवा ते प्रथमच चार्टड विमानात बसलेले नाही. त्यांना या विमानाची सवय आणि परिचयही होता. काल शरद पवार साहेबांनी जे निवेदन केलं त्या गोष्टी आपण मान्य केल्या पाहिजे. हा एक अपघात होता. पण त्या अपघाताची जी काही तांत्रिक कारणं आहेत त्याची चौकशी DGCI करतेय.

भविष्यात विमानप्रवास करणाऱ्यांठी ही धोक्याची घंटा

भविष्यात अनेक महत्त्वाची लोकं अशा विमानातून प्रवास करतात. त्यांच्यासाठी हा धडा आहे. इशारा, धोक्याची घंटा आहे. आम्ही सगळेच प्रवास करतो अशा विमानातून त्यामुळे DGCI तपास करतोय तो योग्य आहे. अत्तापर्यंत अनेक विमान अपघात झाले आहेत. अहमदाबादध्ये झालेल्या त्या भीषण अपघाताच्या चौकशीच काय झालं? गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच त्यात निधन झालं. त्यानंतर तपास पथक नेमण्यात आले. काय झालं त्याचं पुढे? DGCI नेहमीच चौकशी करते पण पुढे जनतेसमोर त्यांच काहीही उत्तर येत नाही, असे राऊत यावेळी म्हणाले.

…पण DGCI ने अपघातांच तथ्य कधीच समोर आणलं नाही

महाराष्ट्राचा एक तडफदार नेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच काल विमान अपघातात निधन झालं. संपूर्ण देश शोक व्यक्त करतोय. विमानात काय तांत्रिक गडबड होती? हे समोर आलं पाहिजे. प्रधानमंत्री, गृहमंत्री, राष्ट्रपती, मुख्यमंत्री यांनी फक्त श्रद्धांजली देऊन काही होत नाही. अपघात जर तांत्रिक बिघाडामुळे झाला असेल, तर त्याच उत्तर शोधाव लागेलं. अशा अपघातांच तथ्य कधीच समोर आलेलं नाही. DGCI चौकशी समिती स्थापन करते, पण त्याचं तथ्य कधीच DGCI ने समोर आणलं नाही, अशी टीका संजय राऊत यांनी यावेळी केली.