Baramati Plane Crash – केंद्रीय संस्थेकडून अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी सुरू

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बुधवारी सकाळी बारामती येथे विमान अपघातात मृत्यू झाला. या अपघाताचा तपास आता केंद्रीय संस्था विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) करत असून चौकशी सुरू केली आहे. चौकशीचा अहवाल राज्य सरकारलाही पाठवण्यात येणार आहे. या अपघाताची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री किंजरापु राममोहन नायडू यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. या पत्राला दिलेल्या प्रत्युत्तरात केंद्रीय मंत्र्यांनी ही माहिती दिली.

विमानातील ब्लॅकबॉक्स ताब्यात घेण्यात आला आहे. विमान अपघात आणि घटना नियमांनुसार विमान अपघात तपास ब्युरोने या अपघाताचा तपास सुरू करण्यात आला आहे. हा तपास पारदर्शी आणि कालबद्ध पद्धतीने होईल, असे केंद्रीय मंत्र्यांनी प्रत्युत्तरादाखल पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. तसेच घटनास्थळावरील तथ्य, ऑपरेशनल तपशील आणि टेक्निकल रेकॉर्ड्स याआधारे अपघाताचा तपास सुरू आहे. या चौकशीत महाराष्ट्र सरकार, स्थानिक प्रशासनाचे सहकार्य लागेल. या तपासाचा संपूर्ण अहवाल महाराष्ट्र सरकारलाही आम्ही देऊ, असे पुढे नमूद करण्यात आले आहे.