
अजित दादांचे राजकारण ‘प्रॅक्टिकल’ म्हणजे संयम व समंजसपणाचे होते. शरद पवार यांचा पक्ष तालेवार, वतनदार लोकांचा होता. अशाच तालेवारांना सोबत घेऊन, त्यांना निवडून आणून दादांनी सत्तेचे राजकारण केले, पण सत्ता सामान्यांसाठी राबवण्याचे कसब त्यांच्याकडे होते. दादांच्या जाण्याने सामान्य जनता रडताना दिसली. तसे दादांच्या राष्ट्रवादीतले असंख्य वतनदार, तालेवारही धाय मोकलून रडले. दादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय पटावर बदल होतील, सोंगट्या सरकतील. वतनदार, तालेवार नवा आश्रयदाता शोधतील, पण त्यांना ‘दुसरे’ दादा मिळणार नाहीत एवढे मात्र नक्की. दादा गेले, त्यांची चिता पेटली व राख बारामतीत विखुरली. त्यांच्या जाण्याने अनेकांच्या जीवनाची राखरांगोळी झाली. लोकनेता गेला की हे असे व्हायचेच!
अजितदादा अनंतात विलीन झाले. हे त्यांचे वय जगाचा निरोप घेण्याचे नव्हते. जगाला, समाजाला, भुईला भार बनलेले अनेक लोक येथे पडिक असताना देवाने महाराष्ट्राच्या लाडक्या दादांनाच का नेले? या वेदनेत महाराष्ट्र तळमळत आहे. दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक बारामतीत जमले. ज्या पंतप्रधान मोदी यांनी अजितदादांवर सत्तर हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप केला, त्याच मोदींनी अजितदादांना श्रद्धांजली वाहताना सांगितले, ‘‘अजित पवार यांचे अकाली निधन हे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. महाराष्ट्राच्या विकासात, सहकार क्षेत्राला त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल ते नेहमीच स्मरणात राहतील.’’ पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे खास दूत म्हणून गृहमंत्री अमित शहा यांना दादांच्या अंत्यविधीसाठी पाठवले. संपूर्ण शासकीय इतमामात दादांना शेवटचा निरोप देण्यात आला, पण एक मात्र सत्य असे की, पंतप्रधान मोदी, देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याचे केलेले आरोप म्हणजे निव्वळ थोतांड, खोटारडेपणाचा कळस होता. दादांवर केलेला कोणताही आरोप ते सिद्ध करू शकले नाहीत, पण सामाजिक जीवनातल्या या नेत्याची यथेच्छ बदनामी केली त्याबद्दल मोदी-फडणवीस हे दादा आणि त्यांच्या कुटुंबीयांची माफी मागणार आहेत काय? आरोप-प्रत्यारोपांचे असे अनेक हल्ले पचवून दादांचे नेतृत्व उभे राहिले. मोदी-फडणवीस यांनी खोट्या आरोपाचे जाळे विणून दादांची कोंडी केली नसती तर दादांनी ‘घर’ सोडून
ढोंग्यांच्या कळपात
शिरण्याचा निर्णय घेतला नसता. शिंदे हे भाजपच्या कळपात शिरले व अस्सल बाटगे बनले. दादांनी भाजपबरोबर सत्तेत सहभागी होऊनही कधी स्वतःचा बाणा सोडला नाही. त्यांनी कधी दिल्लीत हेलपाटे मारले नाहीत. त्यांनी मोदी-शहा-फडणवीसांना स्वतःचे नेते मानले नाही. भाजपचा धर्मांध व समाजात फूट पाडणारा अजेंडा स्वतःवर लादून घेतला नाही. ‘हिंदू-मुसलमान’, ‘पाकिस्तान-भारत’, ‘बटेंगे तो कटेंगे’ वगैरे भानगडीत ते पडले नाहीत. दादा सामान्य लोकांतले होते. त्यांना भाजप, शिंद्यांची ‘थेरं’ स्वीकारण्याची गरज पडली नाही. महानगरपालिका निवडणुकीत त्यांनी सरळ शरद पवारांच्या पक्षाशी युती केली. भाजप काय म्हणेल वगैरे पर्वा त्यांनी केली नाही. पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भाजप काळात कशी लुटली याचे पुरावेच दणक्यात दिले. कुणी तरी दादांच्या सिंचन घोटाळ्यावर बोलले. सिंचन घोटाळ्याची फाईल अद्याप बंद झाली नसल्याचा सुका दम देताच दादांनी त्याच जरबेत सांगितले, ‘‘भाजपच्या सिंचन घोटाळ्याची फाईल माझ्याकडे आहे. पुरंदरमधील एका पाटबंधारे प्रकल्पाच्या टेंडरमध्ये किंमत वाढवून त्यातले शंभर कोटी रुपये भाजपच्या पक्षनिधीकडे वळवले. 1995 चे 100 कोटी म्हणजे आजचे दोन हजार कोटी.’’ हे बोलण्याची हिंमत दादांमध्ये होती. दादा डरपोक नव्हते व त्यांना कोणी घाबरवू शकले नाही. दादांचे राजकारण सर्वसमावेशक होते. ते लोकशाही संकेतांचे पालन करीत. आज राज्याच्या दोन्ही सभागृहांत विरोधी पक्षनेता नाही. दादा याबद्दल खासगीत नाराजी व चिंता व्यक्त करीत. त्यांचे
मन मोठे
होते. विधिमंडळात अर्थ विधेयकावर चर्चा करण्यापूर्वी अधिकाऱ्यांच्या बैठकीत विरोधी पक्षनेता एकनाथ खडसेंना बोलावून ‘‘तुमच्या काही सूचना असतील तर सांगा आणि विधेयकात बदल असतील तर करून घ्या,’’ असे सांगणारे दादा हे एक अजब रसायन होते. राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर स्वतःच्या पक्षाच्या कोटय़ातील जागा विरोधी पक्षाच्या पांडुरंग फुंडकरांना देण्याची दिलदारी फक्त दादाच दाखवू शकतात. अर्थमंत्री म्हणून विरोधी पक्षांच्या नेत्यांना, आमदारांना निधी देण्याचे औदार्य दादांनी दाखवले. दादा मार्मिक होते, मिश्कील होते, तितकेच निरागस होते. गरीबांची कामे ते जागच्या जागी करीत. अजित दादांचे राजकारण ‘प्रॅक्टिकल’ म्हणजे संयम व समंजसपणाचे होते. त्यांनी राजकारणात लाठय़ा-काठय़ा, तुरुंगवासाचा सामना केला नाही, पण सत्तेतून जी संधी प्राप्त झाली त्यातून स्वतःचे लोकाभिमुख नेतृत्व घडवले. शरद पवार यांचा पक्ष तालेवार, वतनदार लोकांचा होता. अशाच तालेवारांना सोबत घेऊन, त्यांना निवडून आणून दादांनी सत्तेचे राजकारण केले, पण सत्ता सामान्यांसाठी राबवण्याचे कसब त्यांच्याकडे होते. दादांच्या जाण्याने सामान्य जनता रडताना दिसली. तसे दादांच्या राष्ट्रवादीतले असंख्य वतनदार, तालेवारही धाय मोकलून रडले. दादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय पटावर बदल होतील, सोंगटय़ा सरकतील. वतनदार, तालेवार नवा आश्रयदाता शोधतील, पण त्यांना ‘दुसरे’ दादा मिळणार नाहीत एवढे मात्र नक्की. दादा गेले, त्यांची चिता पेटली व राख बारामतीत विखुरली. त्यांच्या जाण्याने अनेकांच्या जीवनाची राखरांगोळी झाली. लोकनेता गेला की हे असे व्हायचेच!






























































