
कोकणातील कोळीवाडय़ांच्या जमिनी अधिकृत करण्यासाठी प्रत्यक्ष सर्वेक्षण आणि सीमांकन करण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करणारी समिती गठीत करण्याचा निर्णय आज राज्य सरकारने घेतला. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिह्यांतील कोळीवाडय़ांचा त्यात समावेश करण्यात आला आहे. मात्र शिवसेनेने सीमांकनाची सातत्याने मागणी केलेल्या मुंबई शहर आणि उपनगरांतील कोळीवाडय़ांना त्यातून वगळण्यात आले आहे.
मुंबईतील अनेक कोळीवाडय़ांचे सीमांकन अद्याप बाकी आहे. ते वेगाने पूर्ण केले जावे यासाठी शिवसेना नेहमीच आग्रही राहिली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्री असताना शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी त्याला प्राधान्य दिले होते, मात्र महायुती सरकार सत्तेवर येताच सीमांकनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत गेले.
समिती काय करणार?
कोळीवाडे असलेल्या गावांची तालुकानिहाय यादी.
समुद्राच्या भरतीची उच्चतम सीमारेषा, महाराष्ट्र सागरी मंडळाकडील सीमारेषा तसेच कांदळवनांची सीमारेषा निश्चितीसाठी जिल्हास्तरीय समित्यांचे गठन.
कोळीवाडय़ांचे सीमांकन करण्याची कार्यपद्धती व मार्गदर्शक सूचना निश्चित करणे.
जिल्हाधिकाऱ्यांना कालबद्ध कार्यक्रमासह मार्गदर्शन करणे.





























































