
>> आशिष बनसोडे
दारू ढोसून गाडय़ा चालवू नका अशी वारंवार ताकीद देऊनही उद्दामपणा करणाऱया जवळपास तीन हजार 228 तळीरामांवर थेट पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परिणामी पासपोर्ट किंवा चारित्र्याचे प्रमाणपत्र मिळविण्यासह अन्य बाबींच्या अनुषंगाने त्या तळीरामांची मोठी गोची झाली आहे.
दारू पिऊन गाडय़ा चालवू नका, पर्यायी मार्गांचा वापर करा अशा सूचना वाहतूक पोलिसांकडून वारंवार दिल्या जातात. असे असतानाही अतिउत्साही तळीराम त्याकडे दुर्लक्ष करतात. अशा बेजबाबदार चालकांवर आधी दंडात्मक कारवाई केली जायची, पण त्याचा म्हणावा तसा परिणाम काही होत नव्हता. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी यांची गंभीर दखल घेत ‘ड्रंक ऍण्ड ड्राईव्ह’ प्रकरणात संबंधितांवर थेट गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली. गुन्हे दाखल होऊ लागल्याने संबंधित तळीराम चालकांना पारपत्र, चारित्र्याचे प्रमाणपत्र आदी महत्त्वाच्या बाबी मिळविणे त्यांच्यासाठी कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे सर्वांनी याकडे गंभीरतेने बघावे, असे आवाहनदेखील वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.
दोन हजार परवाना निलंबित
एप्रिल ते डिसेंबर 2025 या कालावधीत ड्रंक ऍण्ड ड्राईव्हचे तीन हजार 711 गुन्हे नोंदविण्यात आले. त्याअंतर्गत दोन हजार 438 परवाने कारवाईकरिता परिवहन विभागाकडे पाठविण्यात आले होते. त्यापैकी दोन हजार 25 परवाने निलंबित करण्यात आले.
– 2025 वर्षाच्या मे महिन्यापासून गेल्या आठ महिन्यांत तीन हजार 228 तळीराम चालक ड्रंक ऍण्ड ड्राईव्हचे गुन्हे दाखल झाले आहेत.
– मे- 290, जून- 469, जुलै- 532, ऑगस्ट- 417, सप्टेंबर- 313, ऑक्टोबर- 343, नोव्हेंबर- 447, डिसेंबर-417 असे गुन्हे दाखल झाले आहेत.
दारू पिऊन कोणीच गाडय़ा चालवू नये. हा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे हा गुन्हा करणाऱयांना कुठल्याही परिस्थितीत आम्ही सोडणार नाही.
z अनिल कुंभारे, सहआयुक्त (वाहतूक)

























































