
हुंड्यासाठी पत्नीचा शारिरीक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी सरकारी कर्मचाऱ्यासह सासरच्या 17 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन एकर जमीन, आलिशान गाडी आणि एक कोटी रोकडसाठी पीडितेचा सतत छळ सुरू होता. त्यानंतर पतीने तिला माहेरी सोडून दिले. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी पतीसह 17 जणांविरुद्ध हुंड्यासाठी छळ, मारहाण आणि इतर गंभीर आरोपांखाली गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे. दिप्तेश पासवान असे आरोपी पतीचे नाव आहे.
उत्तर प्रदेशातील इटावा येथे ही घटना घडली. दिप्तेश आणि हेमलता यांचा 12 नोव्हेंबर 2024 रोजी विवाह झाला. दिप्तेश हा बलरामपूर जिल्ह्यातील उत्तरौला तहसीलमध्ये लेखापाल म्हणून कार्यरत आहे. लग्नात हेमलताच्या पालकांनी हुंडा म्हणून एक कार, दागिने, घरातील वस्तू आणि 25 लाख रुपये रोख दिले होते. मात्र तरीही तिचे सासरचे लोक समाधानी नव्हते.
पीडितेच्या म्हणण्यानुसार, लग्नाच्या पहिल्याच रात्रीपासून तिचा पती तिला कमी हुंडा मिळाल्यावरून टोमणे मारत होता. तसेच त्याचे उत्पन्न त्याच्या पगारापेक्षा अनेक पटीने जास्त असल्याचे सांगत मोठी आलिशान कार, 1 कोटी रुपयांचा अतिरिक्त हुंडा आणि महामार्गावरील पेट्रोल पंपासाठी दोन एकर जमिनीची मागणी केली.
अतिरिक्त हुंड्याची मागणी पूर्ण होत नसल्याने तिला एका खोलीत उपाशी कोंडून ठेवले जात होते. स्वयंपाक करताना सासू आणि लहान जाऊ गरम तेलात पाणी टाकायच्या, ज्यामुळे तेलाचे थेंब अंगावर उडून तिला चटके बसायचे. याशिवाय तिच्या जेवणात विषबाधा आणि झोपेच्या गोळ्या मिसळल्याचा आरोप देखील पीडितेने केला आहे. हुंडा म्हणून माहेरून आलेल्या वस्तू वापरण्यास पीडितेला मनाई होती. तसे केल्यास तिला मारहाण केली जायची. आजारी पडल्यानंतर वैद्यकीय उपचारही केले जात नव्हते, असेही पीडितेने म्हटले.
यानंतर 21 ऑक्टोबर 2025 रोजी भाऊबीजेच्या निमित्ताने तिचा पती तिला महेवा येथील तिच्या माहेरी घेऊन गेला आणि नंतर काही बहाण्याने तेथून निघून गेला. त्यानंतर एक कोटी रुपये घेऊन आली तरच तिला परत नेईन, असे सांगितले. महिलेच्या तक्रारीवरून तिचा पती दिप्तेश पासवान आणि इतर 17 जणांविरुद्ध फ्रेंड्स कॉलनी पोलीस ठाण्यात हुंड्यासाठी छळ, मारहाण आणि इतर गंभीर आरोपांसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
























































