
कुवेतहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली. धमकी मिळाल्यानंतर विमानाचे अहमदाबादमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. टिश्यू पेपरवर लिहिलेल्या चिठ्ठीत ही धमकी देण्यात आली. अहमदाबाद येथील विमानतळावर विमानाचे सुरक्षित लँडिंग करत विमानाची तपासणी सुरू करण्यात आली.
धमकीची चिट्ठी सापडल्यानंतर वैमानिकाने हवाई वाहतूक नियंत्रणाला सूचना दिली. विमान तात्काळ अहमदाबाद येथील विमानळावर वळवण्यात आले. विमानात एकूण 180 प्रवासी होते. सर्व प्रवाशांच्या सामानाची कसून तपासणी करण्यात आली. तपासणीत प्रवाशांकडे कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. बॉम्ब शोध आणि निकामी पथकाकडून विमानाची तपासणी सुरू आहे. आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर विमान उड्डाण करेल, असे विमानतळ अधिकाऱ्यानी सांगितले.


























































